हे गणाधीशा |मंगळांत अमंगळाचे दर्शन घडविणाऱ्या नवकवीनां
सद्बुद्धि द्वे । व त्यांच्या नवकाव्याला पूर्ण विराम दे ||
दुसऱ्या महायुध्दानंतर युरोप खंडातील कांही देशातील लोकांचे जीवन उध्वस्त झाले, त्यांची घरेदारे भूईसपाट झाली, त्यांच्या संसाराची चिरफाड झाली, त्यांच्या आशा-आकांक्षा धुळीला मिळाल्या, उसळत्या रक्ताची तरुणपिढी वीरगति पावली, जिकडे तिकडे तरुण विधवांच्या हृदयभेदक किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या, अनाथ अर्भकांच्या करुण आक्रोशांनी आकाश आक्रंदू लागले, अशा हतोत्साह विगतिक विकलावस्थेत भावनाप्रधान व हळव्या वृत्तीच्या कवीची कविता एक नवे रुप घेऊन अवतरली. या कवींना ऐहिक जीवनासंबंधी वैताग उत्पन्न झाला होता, मानवी व्यवहाराची व शिष्टाचाराची शिसारी आली होती, धर्माविषयी घृणा उत्पन्न झाली होती. राजकारण व राजकारणी व्यक्ति यांच्यावरील विश्वास उडाला होता, विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या परमात्म्याच्या अस्तित्वाविषयी साशंकता निर्माण झाली होती. सगळ्या सत्प्रवृत्तीविरुध्द बंड करावे असे त्यांना वाटत होते. संसार सुखाविषयी त्यांच्या मनांत अरुचि वाढू लागली, विरक्ति स्फुरु लागली, स्मशान वैराग्य संचरु लागले. अशा दारुण, क्षोभक भ्रांत मन:स्थितीत अन्तःकरणांत प्रज्वलित झालेले क्रोधांगार काव्यरुप घेऊन बाहेर पडले. सुसंस्काराच्या प्रभावामुळे आतापर्यंन्त अन्तर्मनाच्या कोपऱ्यात दडलेले विकल्प, विकार आणि विकृति यांचे हिडिस सहजोद्वार त्यांच्या काव्यात थैमान घालू लागले. ज्या एका विकृत वातावरणात हे नवकाव्य फोफावले ते वातावरण किती भीषण, भयानक व बीभत्स होते याची कल्पना आपणास झाली म्हणजे या काव्यामागील प्रेरणा, उद्देश व कारणे आपल्याला कळू लागतात. या काव्याकडे एक प्रकारच्या सहानुभूतीच्या दृष्टीने पहाण्याचा आपल्या मनाचा कल होतो. या बेहोश, बेफाम व बेताल कवीविषयी अपरिहार्य अनुकंपा उद्भवते. याउलट आपल्या देशाची, महाराष्ट्राची स्थिती होती. विध्वंसकारी युध्दाच्या ज्वालांची झळ आपल्याला तितकीशी चाटून गेली नाही. युरोप खंडाच्या मानाने परकीय राजवटीत युध्दामुळे आपली अत्यल्प हानि झाली. पण दुसऱ्या महायुध्दाचा एक भयंकर परिणाम आपल्याला भोगावा लागला. एक अनिष्ट अरिष्ट आपल्यावर कोसळले. अस्मानी सुलतानशाहीला आपल्याला तोंड द्यावे लागले. एका भयानक रोगाने