पान:पुत्र सांगे.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे त्याची अवकृपा आपल्या विपरीत करणीने ओढवून घेऊ नये असे आमचे सांगणे आहे. आम्ही केवळ विरोधासाठी विरोध किंवा भाबड्या वा आंधळ्या श्रध्देने हा विरोध करीत नसून सिनेमागृहाचा सहवास लाभल्यामुळे संस्कृतीची किती व कशी धुळधाण होते याचा डोळसपणाने मागोवा घेऊन. आम्ही केंगणेश्वरी चौकातील या नियोजित सिनेमा थिएटरला कडाडून विरोध करीत आहोत. या निमित्ताने कांही लोकोपयोगी विधायक योजना आम्ही सुचवित आहो.. सांगली येथे वेलणकर मंगल कार्यालया व्यतिरिक्त प्रशस्त व अद्यावत असे अन्य मंगलकार्यालय नाही. अशा प्रकारच्या मंगलकार्यालयाची उणीव नेहमी भासते. तेव्हां एक सुसज्ज मंगलकार्यालय, मंगलधाम करण्यास कांहीच प्रत्यवाय नाही. तसेच बाहेरुन येणाऱ्या अभ्यागत, यात्रेकरु मान्यवर व्यक्तिंना निवांतपणे उतरण्यासाठी विश्रामधामा ( रेस्ट हाऊस) ची सोय येथे नाही, तीही करता येण्याजोगी आहे. त्यामुळे विद्वानाना गणपती मंदिरांच्या शांत आणि प्रसन्न परिसरांत बाचन मनन, चिंतन वा लेखन करण्यास निवांतपणाची सोय होईल. येथील भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या सुप्रतिष्ठित संस्थेला योग्य त्या सुरक्षित जागेचे अभावी महिला वसतिगृह वा संस्थेच्या उपक्रमांचा कार्य विस्तार करता येत नाही. ती त्यांची अडचण दूर झाल्यास एका चांगल्या संस्थेच्या कार्याला चालना मिळेल.

 नियोजित थिएटरचे विज्ञापन प्रसिध्द झाल्यानंतर अनेक स्त्री पुरुष प्रतिष्ठित नागरिकांनी आपला विरोध दर्शविणारी पत्रे प्रसिध्दीसाठी आमचेकडे पाठविली आहेत. परंतु स्थलाभावी आम्ही ती प्रसिध्द करु शकत नाही. या सर्व पत्रांचा मतितार्थ एकच असल्यामुळे पत्रलेखकांचे प्रतिनिधी म्हणून या प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रपंच आम्ही करीत आहोत. श्रीगणपती संस्थानचे विश्वस्त श्रीमंत विजयसिंहराजे यांनी गंभीरपणाने व शांतपणाने याचा विचार करावा अशी त्यांना आमची विनंती आहे.

सा. दक्षिण महाराष्ट्र
दि. ३/१/१९७२
*****
(४८)