पान:पुत्र सांगे.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सांगली, सांगलीवाडी व आसपासची खेडी यांत रहाणारी अनेक मंडळी श्रीगणपतीची उपासक आहेत. संकष्टी, विनायकी, अंगारकी या दिवशी तर भाविक भक्तांच्या झुंडींच्या झुंडी मोठ्या श्रध्देने, भक्तिने, निष्ठेने व नित्यनेमाने गणरायाच्या दर्शनास येतात. गणपतीचे उत्सवात तर सांगलीला पंढरीचे स्वरुप येते. दर्शनास येणारे सर्व लोक निरनिराळ्या जातीजमातीचे, धर्मपंथाचे असतात. स्पृश्यास्पृश्य, हिंदूअहिंदू असा कांही भेद न करता सर्वांना दर्शनासाठी मुक्तद्वार पूर्वीच्या राजेसाहेबांनी करुन ठेवले होते. अशा या शांत, पवित्र, मंगल व प्रसन्न वातावरणांत एक सिनेमा थिएटरची कटकट चालू करण्याची विद्यमान विश्वस्तानां कां दुर्बुध्दि सुचावी हे कळत नाही. भाविकांच्या धर्मभावना दुखविण्यापासून काय लाभ होणार आहे ? या खाजगी धार्मिक विश्वस्तपत्राचा हेतू पूजाअर्चा, उत्सव व परंपरेने आलेल्या प्रथा सांभाळणे असा आहे. धर्म विषयक तात्विक, अध्यात्मिक प्रवचने करणे यासंबंधी समाजांत आस्था निर्माण करणे इ. सद्हेतू या विश्वस्तपत्रामध्ये अन्तर्भूत आहेत. आम्ही हे विश्वस्तपत्र हेतूतः अभ्यासले. पण मोकळ्या आवारांतून सिनेमागृहासारखे बाजारी उत्पन्न मिळवावे असे त्यांत कोठेहि नाही. उलट या मिळकतीच्या उत्पन्नातून परोपकारी धार्मिक संस्थांना सहाय्य करण्याचा आदेश आहे. हे उद्देश दूर सारून देवतांच्या निवासाने पूनित झालेल्या या पुण्यक्षेत्रात थिएटर बांधणे म्हणजे भद्रस्थानी अभद्राची स्थापना करणे होय. व्यवहारांतील अनुभव असा आहे की, एकदां थिएटर बांधले की, त्याच्या अनुषंगाने पानपट्टीची दुकाने, च्याची हॉटेले, जुगाराचे अड्डे, कलालगृहे व वारयोषितांची क्रीडास्थाने यांची उभारणी झाल्यावाचून रहात नाही, तसेच आरत्या, भजने, स्तोत्रे व नामस्मरण यांच्या मंगल घेाषाऐवजी फिल्मी गीते श्रृंगार गीते, बीभत्स लावण्या यांच्या कर्णकर्कश लकेऱ्यांनी सारे वातावरण गुदमरुन जाते.

 म्हणून आम्ही अत्यंत कळकळीने विश्वस्तांना विनंती करतो की, त्यांनी या योजनेपासून परावृत्त व्हावे व असंख्य गणेशभक्तांच्या भावनेचा आदर करुन त्यांचा दुवा घ्यावा. त्यांच्या पितामहानी त्यांचा व त्यांच्या पुढील पिढ्यांचा योगक्षेम थाटाने चालावा इतकी, मिळकत राखून ठेविली आहे. गणपती संस्थानचे उत्पन्न वाढविण्याचे आणखी किती तरी मार्ग उपलब्ध आहेत. पण सांगली संस्थान विलीन झाले असले तरी ज्या गणरायाच्या कृपेने श्री गणपती संस्थान विद्यमान

(४७)