पान:पुत्र सांगे.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विधानसभा व संसद यामध्ये प्रभावीपणाने मांडता येत नाहीत या आक्षेपात तथ्यांश आहे पण त्याला उत्तरदायी पुष्कळशा प्रमाणात विचारवंत वर्ग आहे. एकदा आपण लोकशाही पध्दत स्वीकारली म्हणजे तीत विविध पक्ष निर्माण होणे स्वाभाविक आहे. कोणत्याही पक्षाला आपली निष्ठा न देता बुध्दिवंत आपला सवतासुभा स्थापन करतात. त्यामुळे त्यांना यश मिळण्याचा सुतराम संभव नसतो. निवडणुकीत अपयश आले म्हणजे त्यांचा लोकशाहीवरील विश्वास उडतो. मतदारांच्या बौध्दिक क्षमतेसंबंधी ते अनुदार उद्गार काढू लागतात. मतदारांना खऱ्या अर्थाने साक्षर करणे, विविध पक्षांची भूमिका व दृष्टीकोन ‘समजावून सांगणे, लोकशाहीत मताचे मूल्य काय असते याचे महत्व पटवून देणे ही विचारवंतांची कर्तव्ये आहेत. पण ही कर्तव्ये पार पाडण्याची बुध्दि बुध्दिवतांना होत नाही त्यामुळे लोकशाही अयशस्वी होते व बहुजन समाजाकडून बुध्दिवंतांचा तेजाभंग होतो, मानहानी होते. ही दुरवस्था टाळण्याकरितां विविध पक्षांनी बुध्दिवंतांच्या बुध्दिचा लाभ पक्ष संवर्धनाकरितां व लोकशिक्षणाकरिता करुन घेतला पाहिजे. उलट पक्षी बुध्दिवंतानी आपली अलिप्तता व तटस्थता सोडून सामान्यांविषयी कणव आणि कळवळा दाखविला पाहिजे व त्यांना शहाणे करुन सोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. बुध्दिवंतांचा दुसरा एक आक्षेप असा की वर्तमानपत्रकार त्यांचे विचार आपल्या पत्राच्या वतीने समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत नेऊन भिडवीत नाहीत. या विधानातसुध्दा थोडा सत्यापलाप आहे. याचा एक अर्थ असा होतो की वर्तमानपत्रात जे लेख प्रसिध्द होतात, ते निर्बुध्दानी लिहिलेले असतात. नवविचारप्रवर्तक मूलगामी क्रांतिकारक लिखाण खरा संपादक कधीही नाकारणार नाही. विचारवंतांचे विचार समाजापुढे प्रकर्षाने आणण्याची महनीय कामगिरी वर्तमानपत्रकारांनी आतापर्यंत उत्तम रीतीने बजाविली आहे. या संबंधीत त्यांना दोष देण्यात विशेष स्वारस्य नाही. राजकारणी लोकांच्या लटपटी व षड्यंत्रे यामुळे आपले समाजजीवन गढूळ झाले आहे, असा बुध्दिवंत दावा करतात. हे विधान सत्य व अर्थपूर्ण आहे पण हे गढूळ सामाजिक जीवन निर्मळ तेजस्वी व सतेज करण्याचे उत्तरदायित्व बुध्दिवंतांवरच पडते चुकलेल्या लोकांना योग्य मार्ग दाखविणे, आपली लोकशाही प्रभावी व सामर्थ्यवान करणे ही कामे बुध्दिवंताव्यतिरिक्त इतर कोण करणार जनता व्यर्थ मान देत नाही. मानाचे पान मिळविण्याकरिता हाडाची काडे करावी लागतात, देह

(४३)