पान:पुत्र सांगे.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांचे डोळे उघडत नाहीत त्यांना अज्ञानांधारातून प्रकाशाकडे नेण्याकरितां ते बध्दपरिकर होत नाहीत. म्हणूनच बहुजन समाज त्यांची बूज राखीत नाही, त्यांचा योग्य तो मान ठेवीत नाही, त्यांना खड्याप्रमाणे अलग वेचून दूर फेकतो. मग हे परित्यक्त विद्वान बुध्दिमंत समाजाच्या हेटाळणीचे विषय होतात. ते समाजापासून दूर पळतात. आपले एक स्वतंत्र विश्व निर्माण करतात. बहुजन समाजाविषयी त्यांच्या मनात एक अढी उत्पन्न होते, राष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व राजकीय जीवनाविषयी ते उदासीन बनतात. त्यांच्या दृष्टीने असलेल्या निर्बुध्दांच्या चळवळीत ते रस घेत नाहीत. समाज आपल्या गुणांचे मूल्यमापन करीत नाही म्हणून ते ओरड करू लागतात. आपल्याहून कमी शिकलेल्या कमी बुध्दीच्या व्यक्तीला समाज डोक्यावर घेऊन नाचू लागला की त्यांच्या अंगाचा तिळपापड होतो. त्यांची असूया जागृत होते. ते समाजापासून अधिक दूर होऊ लागतात. पण या व्यक्तीला समाज आपले परमपूज्य दैवत का मानतो याचा विचार ते करीत नाहीत. गोष्टी सांगेन युक्तीच्या चार या मालिकेत बसणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे वंशज म्हणजे आपण असा स्वतः विषयी ते आपसमज करुन घेतात पण प्रज्ञाश्रेष्ठ श्रीकृष्णाचे हात शस्त्रसज्ज होते व प्रसंगी ते द्रौपदीचे पट-वर्धन करण्यास शिवशिवत, तर कधी जेवणावळीतील उष्ट्या पत्रावळी उचलण्यास धावत तर कधी शिशूपालावर प्रहार करण्यास फुरफुरत यांचा त्यांना विसर पडतो. हाताने प्रत्यक्ष कांही कृती करणे त्यांना अप्रतिष्ठेचे वाटते. आपल्या बुध्दीचा त्यांना तो अपमान वाटतो. हे पर्यंकपंडित स्वतःच्या थोरवीविषयी कांही विक्षिप्त कल्पना करतात. बुध्दिमान माणूस कृतिशून्य असला पाहिजे असा त्यांचा समज असतो. कृतिप्रिय व्यक्ती बुध्दीहीन असली पाहिजे असा ते ग्रह करुन घेतात. द्रव्योत्पादन करणे बुध्दीवंतांचे कार्य नव्हे असे त्यांना मनापासून वाटत असते. गरिबी हा आपला बाणा, फकिरी हे आपले व्रत, निस्पृहता हे आपले दैवत व दुसऱ्याला उपदेश करीत सुटणे हे आपले कार्य अशा वृत्तीने ते राहात असतात. जग या मध्ययुगीन कल्पनेपासून किती पुढे गेले आहे याची जाणीव त्यांना होत नाही म्हणून त्यांची घोर निराशा होते. आपल्या अपयशाचे खापर ते सबंध समाजाच्या डोक्यावर फोडतात.

 आता बुध्दिवन्ताजवळ पैशाचा अभाव असतो, सत्तेचा पाठिंबा त्यांना मिळत नाही यामुळे त्यांना निवडणुका जिंकता येत नाहीत व आपले विचार

(४२)