समाजाशी फटकून वागू लागतो. समाज जीवनाशी तो एकरुप होत नाही, त्याच्या सुखदुखाची तो क्षिती बाळगीत नाही, समाजात राहून तो कमलपत्रावरील जलबिंदूप्रमाणे तटस्थ, मला काय त्याचे या अलिप्त व उदासीन वृत्तीने जीवन व्यतीत करतो. आपल्याच चिंतनात व विचारतंद्रीत तो मग्न असतो. बुध्दि या नावाची अलौकिक देणगी विधात्याने आपणास बहाल केली आहे, इतरेजन बुध्दिष्ट आहेत अशी त्याची धारणा असते. तो शास्त्रपारंगत असतो पण बुध्दि विरहित असतो. बुध्दिवंत बुध्दिरहित असतो या वाक्यात विरोधाभास आहे पण तो निव्वळ आभास आहे. बुध्दि या शब्दाचा खरा अर्थ, तत्व व व्यवहार यांचा सुरेख संगम साधणारी, सुंदर समन्वय घडवून आणणारी अलौकिक विवेक शक्ति ज्याच्या जवळ प्रखरतेने वास करते तो समाजविन्मुख कधीच असणार नाही. महात्मागांधी, लोकमान्य टिळक, डॉ. आंबेडकर आदि थोर पुरुष हे खरे बुध्दिवान. उपवास, अहिंसा, सत्याग्रह, असहकार, बहिष्कार आदि म. गांधीच्या तत्वांची लोकांनी चेष्टा केली पण पूर्ण विचाराने ठरविलेल्या मार्गापासून ते च्युत झाले नाहीत म्हणून लोक त्यांना 'भारत भाग्य विधाता' या संज्ञेने गौरवू लागले. विद्येची अखंड उपासना करणारे लो. टिळक तेल्यातांबोळ्यांच्या जीवनाशी समरस झाले म्हणून ते भारतीय असंतोषाचे जनक ठरले. समाजाने बहिष्कृत ठरविलेल्या समाजातील जमातीला योग्य न्याय देण्याकरितां डॉ. आंबेडकरांनी स्पृश्यं समाजाविरुध्द बंड पुकारले म्हणून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर हरिजनांचे एकमेव पुढारी ठरले. हे सर्व श्रेष्ठ पुरुष खऱ्या अर्थाने बुध्दिवान होते. क्रियेवीण वाचाळता करणारे, व्यवहार सोडून तत्वज्ञान सांगणारे, समाजापासून चार पावले दूर राहणारे, आत्मचिंतनात निमग्न असणारे अकर्ते चिंतक नव्हते. या श्रेणीच्या बुध्दिवानाना समाज नेहमीच मान देत आलेला आहे व पुढेही देत राहील. समाजजीवनात जे क्रांती करतात, आपल्या प्रगाढ चिंतनाने व ज्वलंत कृतीने समाज जागृत व सत्-कार्योन्मुख करतात ते खरे बुध्दिवंत. उर्वरित अ अकार्यक्षम, व्यवहारशून्य व केवळ बुध्दीचे भारवाहक !
आज भारतीय समाजामध्ये असा एक बुध्दिवानांचा वर्ग आहे कीं ज्यांना सामान्यांविषयी खरा कळवळा येत नाही, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी ते तन्मयतेने एकरुप होत नाहीत, स्वत:च्या बुध्दिवैभवाने ते दिपून जातात पण आपल्याच देशबांधवांच्या असीम दारिद्र्याने व अगाध अज्ञानाने त्यांची हृदये हेलावत नाहीत,