पान:पुत्र सांगे.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीय समाजजीवनात बुद्धिवंताना त्यांचे योग्य स्थान कां मिळत नाही ?

 आजच्या भारतीय समाज जीवनात बुध्दिवंतांना कांही स्थान आहे काय ? असा प्रश्न मद्रास येथील हिन्दू या वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीने सुप्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ डॉ. चितामणराव देशमुख यांना विचारला. 'नाही' या दोन अक्षरी शब्दांत डॉक्टरमजकुरानी निःसंदिग्ध पण ठाशीव उत्तर दिले. आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कांही कारणे दिली. बुध्दिवंतांजवळ सत्ता नाही, वृत्तपत्रे त्यांचे विचार समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत पोहचविण्याची क्षिती बाळगीत नाहीत, पुरेसा पैसा नसल्यामुळे बुध्दिवंताना निवडणुकी लढवता येत नाहीत, त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रभाव विधिमंण्डळात वा संसदेत पडू शकत नाही. आजचे समाजजीवन, राजकारणी लटपटी व षड्यंत्रे यांनी विलक्षण गढूळ झाल्यामुळे समाजाला बुध्दिमंतांचे महत्व पटत नाही, त्यांना योग्य तो मान मिळत नाही. अर्थातच डॉक्टरसाहेबांना या शोचनीय स्थितीची खंत वाटते पण समाज बुध्दिवंताविषयी अनादर व अनास्था कां दाखवितो याची मूलभूत मीमांसा त्यांनी आपल्या या मुलाखतीत केली नाही व या परिस्थितीत परिवर्तन घडून आणण्यास काय केले पाहिजे याचे यथोचित दिग्दर्शन केले नाही म्हणून आम्ही आमचे विचार या अग्रलेखात माण्डण्याचा प्रयत्न करीत आहोत.

 प्रथमत: ही गोष्ट मान्य केली पाहिजे की आजच्या या राजकीय दृष्ट्या धामधुमीच्या व धक्काबुक्कीच्या काळात बुध्दिवंतांचे विचार समजून घेऊन ते आचारात आणण्यास समाजाजवळ पुरेसा अवधी नाही, अवधी असला तरी इच्छा नाही, अवधी व इच्छा असली तरी हे विचार व्यवहार्य नसल्यामुळे प्रत्यक्षात येण्याची शक्यता कमीच. बुध्दिवन्त, आपला एक स्वतंत्र वर्ग आहे. विचार करण्याचे सामर्थ केवळ आपल्यामध्ये आहे. समाजाला उपदेश करण्याचा अधिकार आपला, समाजाचे नेतृत्व आपण करणार अशा अविर्भावाने चिंतन करीत असतो, बोलत असतो व वागत असतो. समाजाने त्याचे हे स्वयंभू पुढारीपण मान्य केले नाही की तो समाजावर चिडतो, रागावतो, जळफळतो व अंती वैतागाने

(४०)