पान:पुत्र सांगे.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आईच्या चांगुलपणाला दिले आहे. ती सर्वांशी चांगली वागली म्हणूनच सर्वांची सहानुभूती आपल्याला मिळत आहे याची कृतज्ञतापूर्वक नोंद दादांनी केली आहे.

 दादांनी १९८० ते १९८४ च्या दरम्यान वेगळ्या पन्नास नोंदी इंग्रजीतून केल्या आहेत. त्या अधिकच भावपूर्ण आहेत. त्यामध्ये सांसारिक भाग अजिबात नाही. आपल्या मनाच्या विव्हल अवस्थेचं वर्णन त्या नोंदीमधून आहे. त्यांचं चीज कांही वेगळ्या प्रकारे करावं असा मानस आहे. त्यावर थोडं अधिक चिंतन करावं असं वाटतं. तो केवळ एका लेखाचा भाग होऊ नये म्हणून तो विषय मी सध्यापुरता बाजूला ठेवला आहे. असो.

 अज राजाचा विलाप, यक्षाने आपल्या दुरावलेल्या प्रियेला पाठवलेले संदेश, कालिदासाने अजरामर केले आहेत. मी पामर, एवढी भरारी मारण्याची ताकद माझ्या पंखात कुठून यावी ? शहाजहान बादशहा आपल्या ताजमहालाकडे बघत आपल्या स्वर्गस्थ पत्नीचं स्मरण करत असे. माझे वडील गरीब. ते कशाला ताजमहाल बांधतील? पण 'तुझं चिंतन, पूजन, मनन, स्मरण म्हणजेच ही स्मरणगाथा' म्हणणाऱ्या माझ्या वडिलांनी या डायऱ्यांमधून गतस्मृतींचा ताजमहालच उभा केलाय.

 त्याची निगराणी यथाशक्ती करत, कुतुहल असणाऱ्यांना तो नीट 'दाखवणे' एवढंच माझं काम.

(३९)