मनात खोलवर गेली. रुढार्थाने एका सर्वसामान्य दिसणाऱ्या संसारी पुरुषाच्या मनात एवढे 'काव्य' लपलं असेल याची सुतराम कल्पना कुणालाच येणं शक्य नाही. माझ्या दादांचे निधन आणखी दहा-पंधरा वर्षे आधी झालं असतं तर त्यांच्या इतर वस्तूंसारखी या डायऱ्यांची रवानगी अडगळीत केली असती आणि कांही काळाने नको असलेली रद्दी म्हणून फेकून दिली असती ! तथापि पन्नाशीची झुळूक लागल्यानंतर का होईना पण माझ्या हातावर छोटीसी साहित्य रेषा उमटली. हे खरं तर दादांचंच नशीब! त्यामुळे निदान त्या डायऱ्या फाडून तरी टाकल्या नाहीत. फार आस्थेने जपल्या नाहीत तरी माळावर टाकून दिल्या नाहीत. दादांकडे आपले वडील म्हणून न बघता एक त्रयस्थ म्हणून बघितलं तेव्हांच त्यांच्या लिखाणाचे मोल मला उमगले. एरवी 'अतिपरिचयात् अवज्ञा' असाच प्रकार झाला असता.
आपल्या मृत पत्नीशी संवाद साधणारं असे अलौकिक प्रेम क्वचितच आढळेल आणि आजकालच्या संस्कृतीत (?) तर तो एक वेडेपणाचाच भाग ठरेल. आंतरिक उमाळ्यासरशी एखादी व्यक्ती असं कांही लिहेल पण असे उमाळे दीर्घकालीन नसतात. स्फुर्तीच्या झटक्यासरशी एखाद्याचे उत्साहाचे कारंजे उंच उडेल पण थोड्याच काळात ओसरुनही जाईल! दादांचे लेखन त्या दृष्टीने अजोड आहे. तो एक महायज्ञ होता. रोजच्या रोज एका लिखित पानाची समिधा त्यात टाकायची. एक दिवस नाही, दोन दिवस नाही तर सतत चार हजारांहून अधिक दिवस अशी उपासना करायची ही वस्तुस्थिती थक्क करणारी आहे. बरं, यज्ञ म्हणावा तर त्यामागे काही ना काही अपेक्षा असते पण दादांच्या या यज्ञात स्वार्थाचा लवलेशही नव्हता. कितीही तटस्थपणे या डायऱ्या वाचायचा मी प्रयत्न केला तरी ठायी ठायी मला रडू कोसळत होतं. काही प्रसंग माझ्या चांगले लक्षात आहेत. निदान माझ्या संबंधातील तरी. त्या त्या वेळी डोक्यात राख घालून म्हणा वा परिस्थितीच्या रेट्यामुळे म्हणा, मी त्यांना निश्चितच दुखावले होते. अपमानित केले होते. थोड्याशा औत्सुक्याने आणि काहीशा भीतीपोटी मी त्या त्या प्रसंगासंबंधीच्या नोंदी वाचल्या. मी थक्क झालो. दादांनी माझा थोडासुध्दा निषेध केलेला मला आढळला नाही ! उलट काही प्रसंगात स्वतःकडेच दोष घेतलाय. उणेपणा घेतलाय. केवढी क्षमाशील वृत्ती ! डायऱ्यांमधून सर्वत्र मुलांविषयी सुनांविषयी संपूर्ण समाधान आहे. कृतकृत्यता आहे. मुलं, सुना, आपल्या पत्नीच्या बहिणी, तिचा एकुलता एक भाऊ, इतकेच काय पण तिच्या मैत्रिणीसुध्दा आपल्याशी चांगल्या प्रकारे, आपुलकीने वागतात याचे सर्व श्रेय दादांनी आमच्या