Jump to content

पान:पुत्र सांगे.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा प्रकारची चीडचीड शेवटच्या दोन वर्षामधील नोंदीत सारखी सारखी आढळते. ब्रम्हानंदान वाङ्‍‍मयानंद श्रेष्ठ आहे अशी वाक्ये डायरीत नेहमी आढळत.

 लेखन वाचन कमी झालं तशी बी.बी.सी. ऐकायचं व्यसनच त्यांना जडलं. ऐकू कमी येई म्हणून मोठ्यानं लावत. रात्री, पहाटे झोप येईनाशी झाली की बी.बी.सी.च्या बातम्या, नाटके वगैरे कार्यक्रम गादीवर पडल्या पडल्या ऐकत. सांगलीच्या घरात माडीवर त्यांची स्वतंत्र खोली होती. पण डोंबिवलीला आमचा ब्लॉक तसा लहान होता. त्यावेळी माझी मुलगी यु. डी. सी. टी. मध्ये शिकत होती. तिच्या अभ्यासात व्यत्यय येतो याची जाणीव मला क्लेशकारक होई. पण तिने कधीही नाराजी दाखवली नाही. पाहुणे मंडळी आली की, त्यांची झोपमोड होतेय हे मला दिसायचं. पण दादांना कांही सांगणं आम्हाला अवघड वाटायचं. अर्थात आपल्या बी.बी.सी. चा आवाज फार मोठा होतो याची त्यांना बिचाऱ्यांना बिलकुल कल्पना नसे. त्यांना बी.बी.सी. लावता आली नाही ती फक्त हॉस्पिटलमधील शेवटच्या पाच दिवसात. बी. बी. सी. ने प्रकाशित केलेली Getting on in English and Choosing English ही पुस्तके त्यांना खूप प्रिय होती. आपल्या नातवंडांना जवळ बसवून ती पुस्तकं शिकवावीत. त्यातील एक्सरसाईज सोडवून घ्यावेत असे त्यांना फार वाटे. पण वेळा जमत नसत, आणि वेळा जमत तेव्हा दादांना खोकल्याची उबळ हैराण करी. Sixty Steps to precis हे पुस्तक मृत्यूपूर्वी कांही महिनेच आधी त्यांनी खरेदी केलं. मग त्यांनाच या कृतीचा विषाद वाटला. त्यांनी डायरीत नोंद केलीय, "काय हा माझा मूर्खपणा ? आता हे पुस्तक मी कधी वाचू शकणार आहे का ?" हाडाचे शिक्षक असल्याने सारखे शब्दकोश बघ. चरित्रकोश डिक्शनरीत उगाचच शब्दांच्या विविध छटांचा शोध घे, असा त्यांचा सतत चाळा चालू असे.' मृत्यू कसा यावा याविषयी त्यांनी आपल्या डाय-यांमध्ये अनेकवार चर्चा केलीय. त्यात एके ठिकाणी म्हटलंय. "मी लायब्ररीत बसलोय. अनेक संदर्भग्रंथ आजूबाजूला पडलेत. मी त्या ग्रंथांचा अभ्यास करीत टिपणे काढतोय. त्यामध्ये मी इतका निमग्न झालोय की चोरपावलांनी मृत्यू कधी आला ते कळलंच नाही."

 त्यांच्या डायऱ्यांमधून त्रोटक स्वरुपातील वाङमयीन संदर्भ अनेक सांपडले तरी एक नोंद मला फार लक्षणीय वाटली. थॉमस हार्डीची The Woodlanders ही कादंबरी दादांची खूप आवडती होती. त्याविषयीची नोंद अशी आहे.

(३६)