पान:पुत्र सांगे.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुंबईच्या ब्रिटिश कौन्सिलच्या लायब्ररीचे मेंबर झाले होते. मुंबईतील चर्चगेटपाशी असलेल्या ऑफिसमधून पोस्टाने पुस्तके येत असत. कधी सांगलीला मी रजा घेऊन येई तेव्हा दादांसाठी तिथून पुस्तके घेऊन येई किंवा आलेली पुस्तके परत करी. या लायब्ररीमुळे दादांचे इंग्रजी वाचन मनसोक्त होत असे. थॉमस हॉर्डी, सॉमरसेट मॉम हे त्यांचे आवडते लेखक होते. शेक्सपीअरवर उपलब्ध झालेल्या पुस्तकांचा त्यांनी फडशा पाडला होता. त्यावर त्यांना पी. एच. डी. साठी लिखाण करण्याची इच्छा होती. पण ते न जमल्याची खंत वारंवार त्यांच्या डायऱ्यांमधून दिसते. रोजचा टाईम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली, इंडिया टूडे हे त्यांच्या नित्यवाचनात असत. महाराष्ट्र टाईम्स घरीच येई. वाचताना त्रास होई. डोळ्यातून पाणी येई. मग डॉक्टरांनी दिलेले औषध डोळ्यात घालायचे आणि निपचित पडून राहायचे. पुन्हा बरं वाटलं की वाचायचं. पुन्हा पडायचं. असा त्यांच्या अखेरच्या काळातील वाचनाचा बार्शी लाईटसारखा प्रवास होत असे! जे काही वाचून आवडायचं त्यांच्या नोंदी डायऱ्यांमधून आहेत. महाराष्ट्र टाईम्समधील, मेधा काळे यांचे 'कौसानी-गांधीजींचे स्वित्झर्लंड' हा लेख वाचून ते खूप प्रभावित झाले होते. हिमालयातील त्या आश्रमात जाऊन राहण्याची त्यामुळे त्यांना बरीच ओढ लागली होती. Hipple in the Himalayas हे चार्लस् मास्टर्सचं पुस्तक वाचून ते असेच वेडावले होते. त्याची सविस्तर नोंद डायरीमधून आहे. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती, विनोबाजींची गीताप्रवचने, लो. टिळकांचे गीतारहस्य या आवडत्या पुस्तकांवर वेगवेगळ्या वेळी केलेल्या नोंदी आहेत. तुकोबाची गाथा वाचताना आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचताना तर त्यांना वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनाचा जसा आनंद होईल तसा अवर्णनीय आनंद होत असे. त्या आवडत्या ग्रंथांवर अनेक टिप्पण्या डायऱ्यांमधून वारंवार आढळतात. वर्तमानपत्रे, मासिकांमधील कांही लेख वाचून, विशेषतः नरहर कुरुंदकर, ग. प्र. प्रधान, य. दि. फडके अशा मान्यवरांचे लेख वाचून दादांच्या मनाची अनेकदा चरफड झालेली दिसते. आपणही असे काही लेखन करायला हवं होतं याची खंत त्यांनी वारंवार व्यक्त केली आहे. एका नोंदीत त्यांनी म्हटलंय, “आपल्या निरर्थक, निष्क्रिय जीवनाची चीड येते. दिवसभरात . तोंडातून निघणाऱ्या पोकळ, अर्थविहिन शब्दांची वटवट तिरस्करणीय होते. आयुष्यभर आपलं सारं चुकत गेलं अशी मनाला टोचणी लागते. अहंभाव लुप्त होतो. आजवर भाराभर पुस्तके वाचली. काय उपयोग झाला ? स्वार्थ साधला नाही. परमार्थ जमला नाही. धड आस्तिक नाही. धड नास्तिक नाही...

(३५)