Jump to content

पान:पुत्र सांगे.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बसलोय. इंदू, किती प्रसन्न वाटतंय म्हणून सांगू. समोर आकाशात पश्चिमेकडे शुक्राची चांदणी व चंद्राची कोर मोठी रम्य दिसतेय. हे दृष्य मोठे वेधक व गोड वाटतंय. पूर्व दिशेला तोंड करुन आकाशाकडे पाहू लागलो की खालच्या अंगणात एकमेकांशी उंचीच्या बाबतीत स्पर्धा करणारे सुरु आणि माडाचे झाड दिसते. सुरुची स्थिती उंच वाढलेल्या एरंडासारखी असते पण माडाचा दिमाख कांही अनोखाच असतो. या आरामखुर्चीत बसून आकाश न्याहाळण्यात मला विलक्षण आनंद वाटतो. कधी मावळत्या सूर्याचे लालचुटुक बिंब तर कधी उगवत्या चंद्राची आकर्षक कोर, कधी लहान मुलांनी आकाशात सोडलेले पतंग, त्यांची परस्परात लागलेली चढाओढीची झुंज तर कधी गगनातून विहार करणारे नि रात्रीच्या वेळी तेजस्वी ताऱ्यांप्रमाणे किंवा आकाशदिव्यासारखं दिसणारे विमान आदी दृष्ये मोठी विलोभनीय व मनोहारी दिसतात.......!

 असंच लिहिता लिहिता दादा पुढे म्हणतात, आकाश मला उंच करते, विशाल दृष्टी देते. खालची भूमी मला नम्रता, शालिनता आणि सहनशीलता शिकवते."

 दादांनी डायऱ्या लिहायला सुरुवात केली ती आमच्या आईच्या मृत्यूनंतर. तेव्हां त्यांची वयाची पासष्टी उलटून गेली होती. डोळ्यांची शक्ती क्षीण झाली होती. (कदाचित पूर्ववयात अफाट वाचन केल्याचाही तो परिणाम असेल) त्यावेळी ते सांगलीच्या 'दक्षिण महाराष्ट्र' या साप्ताहिकात त्यांचे मित्र कै. गं. गो. बिनिवाले यांच्या आग्रहावरुन लिहू लागले. अर्थात ते सारे लिखाण बरेचसे राजकीय स्वरुपाचे, स्थानिक प्रश्नासंबंधीचे होते. वाङमयीन दृष्ट्या खुलून लिहावं, फुलून जावं असं लिखाण त्यामुळे दादांच्या हातून फारसं घडलं नाही. शेवटच्या सहासात वर्षामध्ये तर दृष्टी मंदावली. रात्र रात्र खोकल्याची ढास लागायची. छातीमध्ये न्युमोनियाचा पॅच तयार झाला. पुढे प्रोस्टेड ग्लॅण्डस्चा त्रास वाढला. यूरीनच्या वेळी मरण: प्राय वेदना होत असत. या सर्व कारणांमुळे वाचन लेखन पूर्णपणे मंदावले. पण अशा विलक्षण त्रासामध्येही त्यांचे डायरी लेखन मात्र अव्याहतपणे चालू असायचं. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांची अक्षरे वेडी वाकडी उमटली आहेत. अस्पष्ट उठली आहेत पण डायरी लेखनात कधी खंड पडला नाही ! आपल्या प्रिय पत्नीशी संवाद हा झालाच पाहिजे ही त्यांची सततची धारणा होती. हे सगळं विस्तारानं सांगायचं कारण इतकंच की त्यामुळे त्यांच्या डायऱ्यांमधून वाङमयीन उल्लेख पूर्ण ताकदीने उमटलेले नाहीत. शेक्सपीअरवर दादांची फार भक्ती होती. तेवढ्यासाठी ते

(३४)