पान:पुत्र सांगे.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जोड्यांचा उल्लेख गौरवाने आला आहे. कृपलानीचं एक वाक्य दादांना फार आवडून गेलं होतं. कृपलानीनी लिहिलंय, “मृत्यूसमयी माणूस परमेश्वराच्या दर्शनाची इच्छा करतो. माझीही तीच मनीषा आहे. पण त्या शेवटच्या क्षणी मला जर माझ्या (मृत) पत्नीची आठवण झाली तर मी परमेश्वराला विसरेन व तिच्या गुणगानात तल्लीन होईन." दादा जवळपासं नास्तिक होते याचा उल्लेख आला आहेच. तरीही त्यांनी एके ठिकाणी म्हटलंय, “परमेश्वरानं जर अखेरची इच्छा विचारलीच तर मी सांगेन की या लिहिलेल्या सर्व संवाद पुस्तिका, स्मृतिलीलामृताचे भाग स्वर्गात घेऊन येण्यास मला परवानगी द्यावी म्हणजे मी तुला ते सर्व वाचून दाखवेन."

 स्वत:ला बुध्दिवादी समजणाऱ्या माणसाचा केवढा हा भाबडेपणा?

 परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी साशंक असतानाच, या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या अज्ञात शक्तिविषयी त्यांना पराकोटीचा आदर होता. प्रेम होतं. महाबळेश्वराच्या दऱ्याखोऱ्यातून हिंडताना, जंगलातून भटकंती करताना, विल्सन पॉईटवरुन सूर्योदय पाहताना, बॉम्बे पॉईटवरुन सूर्यास्त पाहताना ठायी ठायी त्यांना त्या सृष्टीच्या निर्मात्याचं कौतुक वाटायचं. त्यांच्या महाबळेश्वरप्रेमाविषयी अन्यत्र उल्लेख आलेले आहेतच. डायरीत तर दर दोनचार आठवड्यातून उल्लेख आहेत की एकदा महाबळेश्वरला जाऊन यावंसं वाटतं. महाबळेश्वर हा त्यांचा आयुष्यातील एक मोठा 'वीक पॉईंट' होता. एका मित्राला मी दादांच्या विलक्षण महाबळेश्वर प्रेमाविषयी सांगत होतो तेव्हा तो गमतीने म्हणाला, “महाबळेश्वरच्या अनेक पॉईंटविषयी मी ऐकून होतो पण या वीक पॉईंटची कथा काही आगळीच दिसतेय." या महाबळेश्वरातील अनेकवार केलेल्या वास्तव्याविषयी किंवा आईसमवेत केलेल्या काश्मीर सफरीविषयी दादांनी खरं तर भरपूर लिहायला हवं होतं. डायऱ्या वाचायला घेताना तशी माझी अपेक्षा होती. पण एका पानातच (ते सुध्दा वहीच्या) दैनंदिनी लिहायची या स्वतःच घालून घेतलेल्या दंडकामुळे त्यांनी फार लिहिलेले नाही. जागोजागी उल्लेख मात्र भरपूर आहेत.

 खरं तर भावुक होऊन ललित लेखन करण्याची क्षमता दादांच्या भाषेत होती पण पत्रकारितेच्या नादात दादांचे त्या अंगाकडे थोडे दुर्लक्षच झाले. डोबिवलीतील आमच्या घरातील बाल्कनीत बसून त्यांनी डायरीत लिहिलंय,

 "पंचाहत्तरीत पदार्पण केलं म्हणून काल सुमननं बाल्कनीत बसण्यासाठी एक छान आरामखुर्ची आणलीय. अंगाभोवती शाल लपेटून मी त्या खुर्चीत

(३३)