पान:पुत्र सांगे.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तगमग होई. मग नित्याच्या संवादांत ते विचारत,

 "हल्ली तू स्वप्नात का भेटत नाहीस ? तुला माझी आठवण येत नाही का ? देहात्मा देह सोडून गेला म्हणजे पूर्वीच्या देहाच्या बाबतीतील सर्व कांही विसरुन जातो का ? नवे ऋणानुबंध आपल्याभोवती जमवतो का ?......खर तर तुला सुध्दा मला भेटण्याची इच्छा असणारच. मग त्या इच्छेवर नियंत्रण करणारी आणखी एखादी शक्ती आहे की काय ? ती शक्ती तुला आपल्या मनाप्रमाणे वागू देत नाही असं तर नाही ? म्हणजे माणूस जिवंत असतानाही पराधीन आणि मृत्यूनंतरही परतंत्र असतो का ?"

 आणि एके ठिकाणी दादांनी लिहिलंय, “कधी कधी वाटतं का आपण लिहायचं ? हे शब्द काही तुझ्यापर्यंत पोचणार नाहीत. परवाच एका योगी पुरुषाचं भाषण ऐकलं. त्यांनी सांगितलं की कांही विशिष्ट सिध्दी प्राप्त करुन घेतली तर आपण आत्म्याशी बोलू शकतो. मी भला स्वत:ला बुध्दिवादी समजत असेन पण केवळ तुझ्याशी 'बोलता' यावं एवढ्या एकाच इच्छेपोटी त्या 'थिअरी' मध्ये रस घेणार आहे............"

 अशा प्रकारच्या नोंदी वाचल्या की बुध्दिवान माणसंसुध्दा एकटी, एकाकी पडली की किती भाबडी होतात, भावुक होतात याचं आश्चर्य वाटून जातं. जगात असे अनेक विधूर असतील की ज्यांच्या आयुष्यातील जीवनरस त्यांच्या प्रिय पत्नीच्या मृत्यूनंतर आटून गेला असेल. एकटं पडल्याची कटू जाणीव त्यांच्या अंत:करणात घर करुन राहिली असेल. अशा मन:स्थितीतील एका नोंदीत दादा लिहितात, “घराचं ऐश्वर्य बघायला तू नाहीस तर काय अर्थ आहे ? तू (इंदू) गेल्यापासून स्वामित्वाचा हक्क ही भावनाच नाहीशी झाली आहे. एक पाहुणा म्हणून मी घरात (या जगतात) वावरतो. पाहुण्यानी दुसऱ्याला कंटाळा येईपर्यंत मुक्काम ठेवू नये. आपल्याला लवकर हे घर सोडून गेलं पाहिजे याची सतत जाणीव मी ठेवतो.”

 पत्नीबरोबरच्या जवळजवळ चाळीस वर्षाच्या सहजीवनाचा दादांना अत्यंत अभिमान होता. मात्र आपण आपल्या पत्नीची किंमत पूर्णपणाने ओळखली नाही. तिच्या हयातीत आपण तिला अधिक गौरवाने, सन्मानाने वागवायला हवं होतं, ही खंत दादांनी वारंवार आपल्या संवादामधून व्यक्त केली आहे. सहजीवनाविषयीच्या नोंदी करताना जयप्रकाश प्रभावतीदेवी, चिंतामणराव देशमुख - दुर्गाबाई, आचार्य जे. बी. कृपलानी - सुचेता कृपलानी अशा लोकोत्तर

(३२)