जर एखादी गोष्ट पटत नसेल तर त्याविरुध्द ते प्रखर झगडा करत. प्रसंगी एकाकी पडले तरी माघार घेत नसत. या दुर्गुणामुळेच कांही क्षेत्रात ते मागे पडले. आपण आपल्यामागे ताकद उभी करण्यात कमी पडतोय हे जाणवल्यावर, ते आपणहून त्या त्या क्षेत्रातून बाजूला झाले. अर्थात त्यामुळे एकाकी पडले. पण स्वत:च्या बुध्दिला न मानवणारी तडजोड करत बसले नाहीत. तथापि कौटुंबिक जीवनात ते कमालीचे हळवे होते आणि आईच्या निधनानंतर अधिकच हळवे झाले होते.
दादांच्या मनावर स्वामी विवेकानंदांचा आणि त्यापेक्षाही रामकृष्ण परमहंसांचा पगडा होता. त्यासंबंधीत डायरीत अनेक उल्लेख आहेत. एके ठिकाणी त्यांनी लिहिलंय " रामकृष्ण परमहंस म्हणत की आपण ज्या व्यक्तिवर आत्यंतिक प्रेम करतो त्या व्यक्तिच्या माध्यमातूनच देवाची आराधना करावी. म्हणजे देवदर्शन होतं. मोक्ष मिळतो. देवाविषयी मी साशंक आहे. पण असलाच तर तुझ्या ( इंदूच्या) माध्यमातून मी त्याचा शोध घेणार आहे." म्हणजे साध्ध्याविषयी दादा पूर्ण उदासीन होते पण 'माध्यमाचे' प्रेम मात्र त्यांना अधिक आकर्षित करत होतं ! हे माध्यम म्हणजेच ते लिहित असलेल्या डायऱ्या. आत्यंतिक प्रेम असलेल्या आपल्या पत्नीबरोबर आपला जो संवाद चालतो त्या माध्यमाला एक भक्कम समर्थन मिळाल्याचा आनंद त्यांना नक्कीच झाला असेल.
दादांच्या डायऱ्या वाचताना मला आणखी एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं. ते म्हणजे वारंवार आलेले स्वप्नांचे उल्लेख. एकसारखे इंदू, तू स्वप्नात आलीस. आपण अशा अशा विषयांवर बोललो. अमुक प्रसंगात मी असा वागलो पण तू माझी चूक दाखवून माझी कानउघडणी केलीस हे फार बरं झालं, अशा तऱ्हेचे अनेक उल्लेख आहेत. एके ठिकाणी अशी नोंद आहे.
“माझ्या कालच्या स्वप्नात काय दिसलं सांगू ? ज्ञानेश्वरी वाचतावाचता कांही अर्थ जो आजवर मला ज्ञात होता त्यापेक्षा काही तरी वेगळाच आहे असं जाणवलं..... डोळ्यासमोर तो अर्थ स्पष्ट होऊ लागला. मोठाच शोध लागल्यासारखं वाटलं. इतका आनंद झाला की त्या भरात इंदू, ही बघ काय गंमत झाली म्हणून सांगायला लागलो..... आणि एकाएकी जाग आली."
याउलट इंदू तू हल्ली स्वप्नात का दिसत नाहीस म्हणून त्रागा केलेलाही आढळतो. येणाऱ्या जाणाऱ्या परिचितानी, नातेवाईकांनी, मुलांनी, सुनांनी एकसारखे इंदूविषयी बोलावं. जुन्या आठवणी काढाव्यात असे दादांना नेहमी वाटे. ही गोष्ट नेहमी नेहमी कशी शक्य होणार ? अशा वेळी त्यांच्या मनाची खूप