पान:पुत्र सांगे.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पडतात अशा कांही अपूर्व काल्पनिक विश्वात आपण राहतो. थोडा वेळ का होईना पण अगदी स्वर्गसुख मिळाल्याचा अनुभव येतो म्हणून हा नित्यक्रम मी चालू ठेवणार. हा छंद, हे वेड, ही लहर, हा ध्यास म्हणजे माझं जीवन आहे. "

 अशा स्वरुपाच्या भावना अनेकवार व्यक्त झालेल्या आहेत. आपल्या जिवाभावाचं कोणी आहे. आपलं बोलणं कान देऊन ऐकतंय असा गोड आभास होतो. त्या भासावरच मी जगतो असं दादांनी बरेचदा म्हटलंय. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये, एकसारखी येणारी, घरातील इतरांची झोप उडवणारी खोकल्याची ढास, फजितीची वेळ आणणारी लघवी, तर कधी कधी तटणारी लघवी, लघुशंकेच्या वेळी होणारा असह्य दाह, भयानक वेदना, हे सगळं मी तुझ्याशिवाय कुणाला सांगणार ? म्हणून हे संवाद असे दादांनी म्हटलंय. ते पुढे लिहितात,

 "हे संवाद म्हणजे माझ्या मनाचा विरंगुळा आहे. खरा विसावा आहे. निवारा आहे. शांतिस्थान आहे. मी जुन्या संवाद वह्या चाळून पाहतो तेव्हा विलक्षण आनंद होतो. पण या संवाद-वह्यांचे भवितव्य काय ? आताच बरीचशी अक्षरे पुसट होत चालली आहेत. कांही शब्द तर संपूर्ण नष्ट झाले आहेत. पण माझ्यासाठी नाहीत. मी वाचायला लागलो की ते नष्ट झालेले शब्द मला स्पष्टपणे दिसू लागतात........... लोक आत्मचरित्रं लिहितात. पण त्यात प्रसिध्दिचा मोह असतो. मी मात्र तुझी स्मृतिपूजा केवळ माझ्या, माझ्याच मनाच्या समाधानासाठी करतो."

 अशाच एका संवादात दादा लिहितात " ही डायरी मी का लिहतो? हा एक प्रकारचा Dramatic Monologue आहे. जवळजवळ चाळीस वर्षाच्या संसारात मी अनेकदा अनेक विषयांवर बोलत असायचा श्रोता केवळ तू असायचीस. माझं बोलणं, माझे विचार तुला आवडायचे. माझ्या भाष्यांवर तुझं प्रेम असायचं. ही डायरी म्हणजे ते जुने संवादच. या डायरीचे लिहून झालेले भाग वाचताना माझा तो भूतकाळ पुन्हा सजीव होतो. म्हणून हे लिखाण मला आवडते."

 दादा स्वत:ला तर्ककठोर बुध्दिवादी समजत. त्यात क्वचित भूषण मानत. पण तसे ते नव्हते. बाहेर ते एखाद्या विषयावर मतभेद झाले तर वितंडवाद घालत असत. निस्पृह होते. त्यामुळेच परखडपणे बोलत. आपल्या शैक्षणिक जीवनात, नंतर भाग घेतलेल्या अनेक सामाजिक-सांस्कृतिक कार्यात, बुध्दिच्या कसोटीवर

(३०)