पान:पुत्र सांगे.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केलेल्या असत. त्यातील दोन कविता त्यांचे अत्यंत लाडके कवी, भा. रा. तांबे यांच्या असत. पहिली कविता 'जन पळभर म्हणतील हाय ! हाय! मी जाता राहील कार्य काय' ही असे. दुसरी कविता "सहज तुझी हालचाल, मैत्रे जणु. मोहिते", ही असे, तर तिसरी कविता कवी अनिल (आ. रा. देशपांडे) याची कितीक काळ हालला, असा तुझ्याविना, कळे ना श्वास चालला, कसा तुझ्याविना.' ही असे. या कविता प्रत्येक डायरीत स्वतंत्रपणे आणि पूर्णपणे लिहिलेल्या असत. डायरीवर अनुक्रम नंबर असे. प्रत्येक पानावरील नोंदीवर त्या त्या दिवसाची तारीख असे. प्रत्येक पानावर दोन्ही बाजूनी ते मजकूर लिहित. पण त्यामुळे माझा एक तोटा असा झाला की दोन्ही बाजूंचे अक्षरांचे छाप उमटल्यामुळे, बरीच अक्षरे नीट दिसेनाशी झाली. अशा एकूण २४ डायऱ्या, म्हणजे जवळपास चार हजार पाने लिहलेली आहेत. आजारपणाच्या काळात रोजच्या लिखाणात खंड पडलेला असला तर दादा खाडा पडलेल्या दिवसांचा एकत्रित गोषवारा लिहित.

 आता कुणालाही प्रश्न पडेल की एवढा प्रचंड खटाटोप त्यांनी का केला ? खुद्द दादानांही असाच प्रश्न वारंवार पडलेला असे. त्यांनी स्वतःलाच विचारलंय, “हा सगळा उद्योग मी का करावा किंवा का करतोय याचं उत्तर माझं मलाच मिळत नाही ? हॅम्लेट म्हणतो त्याप्रमाणे या सृष्टीच्या व्यवहारात मला यत्किंचितही गोडी वाटत नाही. इंदू, तुझं स्मृतिगान करण्याची फलप्राप्ती काय ? काहीही साधण्याची आशा नसताना मी अगदी नियमितपणे हे व्रत का आचरत आहे ? तुला बरं वाटावं म्हणून ? छे, तुला तर यातलं काहीच कळत नाही ? मी या प्रकाराला दोन प्रेमी जीवांचा सुखसंवाद मानतो. हा संवाद चालू असताना तू आपल्या पूर्वीच्या स्वरुपात माझ्याशी बातचीत करत आहेस. माझं म्हणणं ऐकत आहेस, इतकंच नव्हे तर आपलं म्हणणं सुध्दा आग्रहाने मांडत आहेस असं काहीसं वाटतं. आपलं बोलणं कोणाला ऐकू जात नाही. ते आपल्या दोघांना कळतं, इतर जगाचा आपल्या बोलण्यात व्यत्यय येत नाही. तू अन् मी म्हणजे विश्व असा भास होतो. दिवसातल्या साऱ्या घटना ज्या मला महत्वाच्या वाटतात त्या तुला काही एक आडपडदा न ठेवता सांगतो. हृदयाविष्काराचा हा एक अपूर्व प्रकार आहे. यानं मला खरीखुरी शांति मिळते. मन मोकळं होतं. माझी सुखदुखं, माझे मानापमान, माझ्या व्यथा अन् माझ्या कथा, माझ्या भावना अन् माझे विचार सारे तुला समजावून सांगतो. तू लक्षपूर्वक ऐकतेस. तुझे भावतरंग माझ्या कानांवर

(२९)