पान:पुत्र सांगे.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक कथासंग्रहही निघाला. या धामधुमीत स्वतःच लावून घेतलेल्या इतर सामाजिक व सांस्कृतिक कामांमध्ये वेळ गेला. एक दुर्देवाची गोष्ट म्हणजे दरम्यानच्या काळात माझ्या भावजयीला, कै. सौ. चारुला कॅन्सरने गाठले. चार वर्षाची झुंज देवून १२ ऑक्टोबर २००२ मध्ये तिचे निधन झाले. विलक्षण धैर्याने तिची मृत्यूशी चाललेली झुंज पाहात असताना आम्हाला आमच्या आईच्या आजाराची आठवण यायची.

 दिवसांमागून दिवस गेले. वर्षामागून वर्षे गेली. त्या डायऱ्या बिचाऱ्या अहल्येसारख्या शापित अवस्थेत पडल्या होत्या !

 आणि जुलैमधील एका पहाटे अचानक मला साक्षात्कार झाला. तो आषाढाचा पहिला दिवस होता. कालिदास दिन. त्यानिमित्त आयोजित एक व्याख्यान ऐकताना त्या यक्षाच्या कथेवरुन मला दादांच्या डायऱ्यांची तीव्रतेने आठवण झाली. आणखी एक निमित्त झालं. सांगली नगरवाचनालयात आमच्या आईच्या नावे देणगी देवून तिच्या नावाने ज्या मराठी गीतगायनस्पर्धा १९७८ सालापासून भरवल्या जात त्या उपक्रमांचे यंदाचं रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्तानं या डायऱ्याविषयी कांही लिहिता आले तर ? दादांच्या आत्म्याला किती बरं वाटेल ? त्यांच्या वृध्दापकाळात त्यांच्यावर अन्याय केल्याची जी टोचणी मनाला लागली होती त्याचे थोडे तरी परिमार्जन केल्या सारखे होईल, या विचारानेच मला आत्मिक समाधान झाले. मग मात्र मी झपाटल्यासारखा झालो. सगळ्या डायऱ्या काढल्या आणि एक संपूर्ण आठवडा त्यांचे वाचन करण्यात घालवला. पाने खूप जीर्ण झाली होती. अक्षर पुसट झाले होते. अनेक ठिकाणी अजिबातच दिसेनासे झाले होते. चार हजार पृष्टांचा तो दादांचा महायज्ञ पाहून छाती दडपली. यक्षाने मेघामार्फत संदेश पाठवला. ते मेघदूत लिहायला कालिदासाचीच प्रतिभा हवी. तिचा तर आपल्या ठायी मागमूसही नाही. हाताशी वेळ थोडा असल्याने दीर्घकाळ चिंतन करुन लिहणे अशक्य.

 तेव्हां मी माझ्यापुरता सुवर्णमध्ये शोधला. आपल्या कुवतीनुसार या डायऱ्यांचा परिचय करुन द्यायचा.

 दादा प्रत्येक डायरीच्या प्रारंभी आईचा जन्मदिन आणि मृत्यु - दिन भारतीय तसेच इंग्रजी कालगणनेनुसार नोंदवत. त्याच्याखाली त्वमेव माता, पिता त्वमेव हा श्लोक लिहित. ते स्वाभाविकच होते. आमची आई हेच दादांचे सर्वस्व होतं. माता, पिता, बंधू, सखा वगैरे सर्व नाती त्यांच्यासाठी आईच्या ठिकाणीच एकवटलेली होती. अखेरच्या पानावर त्यांच्या तीन आवडत्या कविता उद्धृत

(२८)