पान:पुत्र सांगे.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेंव्हा ते चिडचिडे झाले आणि पुन्हा ग्लानीत गेले. आता मला वाटतं (म्हणजे डायऱ्या वाचल्यावर) की त्यांना डायऱ्यासंबंधातच काहीतरी सांगायचं असावं.

 या डायऱ्या त्यांच्या निधनसमयी डोंबिवलीतच माझ्याकडे होत्या. त्यांच्या अखेरच्या आजारपणात, एक दोनवेळा या डायऱ्यातील कांही निवडक भागाचे वाचन त्यांच्या थोरल्या मुलाने, म्हणजे मी सर्वासमोर एकवार करावं असं ते माझ्या बायकोजवळ बोलले होते. पण इतक्या सहजतेने ते बोलले की त्यातील गांभीर्य तिला फारसे जाणवले नाही. तथापि तिने सर्व डायऱ्या काळजीपूर्वक एका खोक्यात बांधून ठेवल्या. १९९६ सालच्या अक्षयतृतीयेच्या दिवशी मुंबईतील ३५ वर्षाचे वास्तव्य संपवून, कायमचे सांगली निवासी बनण्यासाठी आम्ही प्रस्थान ठेवले तेव्हा त्या सगळ्या डायऱ्या आमच्या सामानाबरोबर सांगलीत आल्या. एका अर्थाने त्या स्वतःच्याच जन्मगावी आल्या !

 दरम्यानच्या काळात माझ्या हातावर साहित्यरेषा उमटली ! दादा असेपर्यंत दोन तीन लेखच महाराष्ट्र टाईम्स्, लोकसत्ता, अशा मुंबईतील वृत्तपत्रातून प्रसिध्द झाले होते. दादांना त्या गोष्टीचा खूप आनंद झाला होता. त्यांनी माझे तोंड भरुन कौतुक केले. डायरीत त्यासंबंधात सविस्तर नोंदी आहेत. त्यावेळी त्यांना वाटून गेले असावे की या डायऱ्यामधील कांही महत्वाच्या भागाचे वाचन मी सर्व कुटुंबियांसमोर करावे. तशा नोंदी आहेत आणि त्याच वेळी माझ्या बायकोजवळ त्यांनी उपरोक्त बोलणे केले असावे.

 सांगलीत आल्यावर मी कांही डायऱ्या चाळल्या तेव्हा चकित झालो. साहित्यिक मूल्य असलेल्या आणि मनाच्या वेगळ्याच उंचीवरुन झालेले ते लिखाण वाचून मी गलबललो. दादांची जी योग्यता होती त्याला अनुरुप वर्तन आपल्या हातून घडले नाही या जाणीवेने मला अपराधी वाटू लागले. डायरी वाचताना अश्रू अनावर होत होते. त्यामधून एखादी साहित्यकृती निर्माण होऊ शकते याची पुसटशी जाणीव मला झाली. तथापि त्या डायऱ्या वाचताना मनाची जी विकल अवस्था होत होती, त्यामुळे तशा त्या विकारवश अवस्थेत आपल्याला कांही करता येणे अशक्य आहे, याची मला जाणीव झाली. आपण तटस्थपणे या डायऱ्यांकडे बघू शकत नाही तोवर गप्प बसावे असे मी ठरविले. बरं, हे काम कुणा लेखक मित्रावर सोपवण्यासारखं नव्हतं. त्यानंतरची तीन चार वर्षे मी माझे दुसरे पुस्तक 'सांगली आणि सांगलीकर' सिध्द करण्याच्या, प्रकाशित करण्याच्या खटाटोपात बुडून गेलो. सुदैवाने त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. लगोलग माझा

(२७)