पान:पुत्र सांगे.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आयुष्याच्या अखेरीपर्यंत बंदच रहावा असंच वाटत असावं. भावनेच्या भरात आणि विशेषतः मला थोडीफार साहित्यदृष्टी आली आहे असे वाटून दादांना असं जरुर वाटलं होतं की त्यांच्या थोरल्या मुलानं (म्हणजे मी) या डायऱ्यामधील संकलित भागाचे त्यांच्यासमोर वाचन करावे. इतर कुटुंबियांनी ते श्रवण करावे. पण पुढच्याच वाक्यात निग्रहाने त्यांनी तो विचार बाजूला सारलाय. त्यानीच म्हटलंय की तसं केलं तर या संवादांमध्ये जी एक नि:संकोच सहजता आहे ती नाहीशी

होईल.

 .दादांचे डायरी लेखन बहुदा सकाळी चाले या कामात ते अति तत्पर असत. एकदा सांगलीहून डोंबिवलीला जायचं म्हणून सगळं सामान (डायऱ्यांसकट) बांधले गेले होते तेव्हा दादांनी पहाटेच उठून एका सुट्या कागदावर मजकूर लिहिला आणि डोंबिवलीला पोचल्यावर तो मजकूर डायरीच्या योग्य त्या पानावर पुन्हा लिहिला !

 माझ्या भावाची रवीची बदली नागपूरजवळच्या ब्रम्हपूरी येथील स्टेट बँकेत १९८३ मध्ये झाली तेव्हा त्याला तेथे बिन्हाड थाटून राहणे भाग पडले. त्यामुळे सांगलीतील प्रदीर्घ वास्तव्य संपवून दादांना डोंबिवलीला माझ्या बिन्हाडी येऊन राहावे लागले ते अखेरपर्यंत. दरम्यानच्या काळात सांगली, पुणे, ब्रम्हपूरी असे त्यांचे छोटे छोटे मुक्काम पडले. त्यामुळे या सर्व डायऱ्या त्यांना इकडून तिकडे हलवाव्या लागत. त्यांचे ओझे होई. पण त्यासाठी तडजोड नव्हती. एखाद- दुसरा कपडा सामानातून कमी झाला तरी त्यांना त्याची फिकिर नसे पण तारीखवार लावलेल्या डायऱ्या मात्र ते काळजीपूर्वक स्वतः बरोबर घेऊन जात. त्या डायरीमधील शेवटच्या म्हणजे चोवीसाव्या भागातील अखेरची नोंद आहे ती १५ जुलै १९८५ रोजीची. त्या रात्रीपासून ते २१ जुलैला त्यांचे निधन होईपर्यंत ते अर्धवट बेशुध्दावस्थेतच होते. आमच्या बिल्डिंगमधील मित्रांच्या मदतीने माझ्या दुसऱ्या मजल्यावरील ब्लॉकमधून एका खुर्चीत घालून त्यांना आम्ही १५ जुलैच्या रात्री खाली आणले आणि अॅम्बुलन्सने डॉ. राव यांच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. एका मध्यरात्री त्यांनी मला हलवून जागे केले. काहीतरी सांगायचा ते प्रयत्न करीत होते. पण शब्द उमटत नव्हते. त्यांची एक पैशाची काळी बॅग होती. हॉस्पिटलमध्ये अॅडमीट झालो तेव्हा ती बॅग घरी होती. आम्ही व्यवहारी जगात वावरणारी माणसं. आमची धाव कुठवर जाणार ? मला वाटले ते त्यासंबंधातच कांहीतरी सांगत आहेत म्हणून मी त्यांना ती बॅग आणतो वगैरे काहीसे बोललो

(२६)