पान:पुत्र सांगे.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चार हजार पानांच्या समिधा म्हणजे आमच्या दादांच्या डायऱ्या. ती थोर पती पत्नी म्हणजे माझे आई-दादा. त्या डायऱ्यांचीच ही कथा !

-------**-------

 आमच्या आईचे निधन १७ सप्टेंबर १९७४ रोजी झाले. त्यानंतर दादांचे निधन २१ जुलै १९८५ रोजी झाले. आईच्या मृत्यूनंतर दादा रोज एक पान मजकूर लिहित. त्यामध्ये रोजच्या घडामोडी असत. कोण घरी आलं, कोण गेलं याचा उल्लेख असे. कांही वाचले वा पाहिले तर त्याविषयीची चर्चा असे आणि बरेच वेळा मुक्त चिंतन असे. आयुष्यात आपण केलेल्या चुका, आपल्या पत्नीची आपल्याला न कळलेली किंमत, त्यासंबंधीची पश्चातापाची भावना, वगैरे अनेक गोष्टी या चिंतनात असत. एक्सरसाईज बुकच्या एका पानावर मावेल इतकाच मजकूर लिहायचा असा दंडक त्यानी स्वत:ला घालून घेतला असावा. कारण कधीही एका पानाची दोन पाने झाली नाहीत किंवा लिहायला मजकूर नाही म्हणून पान अर्धे राहिलेले नाही. दोनशे पानी वह्यांचे एकूण चोवीस भाग त्यांनी आई गेल्यानंतरच्या अकरा वर्षात लिहले आहेत. काटेकोर हिशोबाने अकरा वर्षाचे ४०१५ दिवस होतात. दादांनी जवळजवळ चार हजार पाने भरतील एवढा मजकूर लिहिला आहे.

 आणि हा सगळा मजकूर आमच्या आईला उद्देशून आहे. जशी काही आपली पत्नी समोर बसली आहे. ती नेहमीप्रमाणे भाजी नीट करत आहे, किंवा तांदूळ निवडत बसली आहे आणि आपण तिच्याशी बोलत आहोत, कांही हितगुज करत आहोत अशा अविभार्वात दादांनी सगळा मजकूर लिहिला आहे. मी रुढार्थाने या सर्व लेखनाला दादांच्या डायऱ्या म्हणत असलो तरी खुद्द दादांनी त्याला छान नांव दिले आहे. या सगळ्या वह्यांना ते “संवाद पुस्तिका" म्हणत. क्वचित हितगुज पुस्तिका असंही म्हटलं आहे.

 आपल्या या डायऱ्यांविषयी दादा आमच्याशी कधीच बोललेले नाहीत. दादा या वह्या म्हणजे आपली इस्टेट समजत, तथापि त्या वह्यांचे आपल्या मृत्यूनंतर काय करायचे याविषयी एकही अवाक्षर आमच्याजवळ दादांनी उच्चारलेले नाही. ते नित्य नेमाने कांही तरी लिहितात एवढेच आम्हाला माहित होते पण त्याबद्दल काही विचारायचे सौजन्य आम्ही कधी दाखविले नाही वा त्यातील मजकूर चोरून वाचावयाची फाजील उत्सुकताही आम्ही कोणी दाखवली नाही. खरं म्हणजे त्याविषयी थोडंसं मायेने, आपुलकीने आपण बोलायला हवं होतं असं त्या डायऱ्या चाळल्यानंतर वाटून गेलं ! पण खुद्द दादांना मात्र तो कप्पा आपल्या

(२५)