पान:पुत्र सांगे.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दादांच्या डायऱ्या - एक विलक्षण स्मृति-यज्ञ

 एक बुध्दिवादी गृहस्थ. स्वत: ला तसं समजणारा आणि बुध्दिवादी म्हणवून घेण्यात अभिमान बाळगणारा. वय वर्षे ६४, त्याची पत्नी नुकतीच नोकरीतून रिटायर झालीय. दोन्ही मुलं सुखात आहेत. या पती-पत्नीनी अतिशय हालअपेष्टात आपले उमेदीचे आयुष्य घालवलंय. आता सुखाचे दिवस समोर दिसत आहेत. मनसोक्त भटकायचं, नाटकं बघायची, संगीताच्या मैफली ऐकायच्या, नातवंडांत रमायचं. दोन्ही मुलांना आपलं अप्रूप आहे. कधी या मुलाकडे तर कधी त्या मुलाकडे उर्वरीत आयुष्य घालवायचं....

 या सुखस्वप्नात दंग असतानाच पत्नीवर कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाचा घाला पडतो. वर्षा-सव्वावर्षाचं यातनामय आजारपण आपण डोळ्यांनी बघतोय. क्षणाक्षणानी जवळ येणारा मृत्यू समोर दिसतोय.....आपण हतबल आहोत या जाणीवेने पतीचे हृदय विदीर्ण झालंय. डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे बघितलं की कळतंय. त्यांचाही निरुपाय आहे. पती रोज पहाटे ज्ञानेश्वरीचा पाठ वाचताना देवाची, हो आता बुध्दिवादी मनाला तोच आधार, विनवणी करतोय. बाबारे, सोडव माझ्या बायकोला या यमयातनांतून..... एक दिवस ते निरांजन शांत होतंय.

 त्यानंतर पतीचा एक यज्ञच सुरु होतो. रोजच्या रोज पत्नीची आठवण जागवायची कशी ? रोज एक पानभर मजकूर लिहायचा आणि तिला अर्पण करायचा. रोजच्या रोज तिच्याशी बोलायचं, संवाद साधायचा, भूतलावरील साऱ्या घडामोडी तिला सांगायच्या. आपल्या सुखसंवेदना शब्दांतून तिच्यापर्यंत पोचवायच्या.

 असा हा संवाद किती दिवस चालावा ? तब्बल ११ वर्षे म्हणजे ४०१५ दिवस. भावनेच्या भरात कुणी असं करेल. थोड्याच काळात कंटाळून जाईल हे निश्चित, पण एखादं व्रत अंगिकारल्यासारखं सतत चार हजार पानांची समिधा टाकत आपल्या पत्नीचं स्मरण रोज जागतं ठेवायचं ही गोष्ट किती लोकविलक्षण ? बरं, यातून काहीही साधणार नाही हे माहित आहे. परमेश्वर प्रसन्न होऊन पत्नीला भूतलावर पाठवेल ही आशा नाही. अत्यंत निरपेक्ष मनानं आपल्या पत्नीचा स्मृती यज्ञ आपल्या आयुष्याच्या अखेरचा श्वासापर्यंत जागता ठेवणारा पती, मनाच्या केवढ्या विलक्षण उंचीवर वावरत असला पाहिजे........?

 ती उंची कळायला माझ्या आकलन शक्तिला तब्बल १८ वर्षे लागली. त्या

(२४)