पान:पुत्र सांगे.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षणक्षेत्रातील सहकारी, राजमती या दोघींनी किती विलक्षण मनसुबे रचले होते याचा आम्हाला पत्ताच नव्हता. उगाच हवेत बोलण्याचा आईचा स्वभावच नव्हता. कै. राजमतीबाई पाटील यांना समारंभपूर्वक 'सांगली भूषण' हा किताब, १९९८ मध्ये प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते देण्यात आला. तेव्हा हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत राजमती बाईंनी आईचे नांव घेतले. मी आणि इंदू मिळून काय काय करणार होता, कसे कसे बेत आखले होते, आणि इंदूच्या अचानक निधनाने माझा जीवनरसच कसा आटला हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहात होतेच पण एवढ्या मोठ्या गर्दीसमोर, आईचा गौरवपूर्ण आणि यथार्थ नामोल्लेख ऐकताना आम्हा कुटुंबियांना गहिवरुन येत होतं. आईची थोरवी मला नव्यानेच पुन्हा उमगली.

 आई-दादांच्या भावजीवनाचा परमोच्च बिंदू म्हणजे आईच्या मृत्यूनंतर दादांनी लिहिलेल्या डायऱ्या. त्याला त्यांनी 'संवाद - पुस्तिका' म्हटलंय. आई गेल्यावर म्हणजे १७ सप्टेंबर १९७४ नंतर त्यांच्या २१ जुलै १९८५ या मृत्युदिनापर्यंत त्यांचा या डायऱ्यांद्वारे आपल्या स्वर्गस्थ पत्नीबरोबर सातत्याने संवाद चालू होता. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्यापूर्वीच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यात नोंदी आहेत. जशी काय समोर आपली प्रिय पत्नी बसली आहे आणि तिला आपण दिवसभरातल्या घटना सांगत आहोत, मुलांचे, सुनांचे, नातवंडांचे कोडकौतुक सांगत आहोत, तू असतीस तर किती वेगळ्या प्रकारे तू मुलांचे वाढदिवस, बारशी, मुंजी वगैरे समारंभ साजरे केले असतेस, मी तुझ्याविना किती उणा पडतोय अशा थाटात डायऱ्यांचे लेखन झाले आहे. आपण लिहिलेले लेख, वाचलेले उत्तम साहित्य याची त्यात चर्चा आहे. या भूतलावरुन लौकरात लौकर परमेश्वराने सोडवावे आणि तुझी भेट घडवावी अशी वेळोवेळी केलेली विनवणी आहे.

 माणूस आत्यंतिक उर्मीपोटी एखादी गोष्ट करतो. पण नंतर कंटाळण्याची त्याची सहजप्रवृत्ती असते. पण हातात पेन घेऊन सतत ११ वर्षे हा विलक्षण यज्ञ तेवत ठेवणे ही केवढी अलौकिक बाब आहे ? नुसता दादांचा मुलगा म्हणून नव्हे तर एक त्रयस्थ म्हणूनही अशा प्रकारच्या उच्च कोटीच्या विशुध्द प्रेमाची कशी शब्दपूजा बांधावी तेच मला समजत नाही. स्वत:चे खुजेपण अशा वेळी प्रकर्षाने जाणवते ! दादांच्या निधनानंतर हे सगळे पाहून माझी अत्यंत संवेदनाक्षम कवयित्री मैत्रीण, सौ. मंजुषा गोसावी म्हणाली, "तुझ्या वडिलांच्या डायऱ्या म्हणजे

(२२)