पान:पुत्र सांगे.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विद्यार्थ्यांच्या सहवासात त्या दोघांचेही भान हरपून जायचे. त्याविषयी त्यांच्या अनेक विद्यार्थी विद्यार्थिनीनी अनेकवार सभेतून सांगितलेय, लेखांमधून नमूद केलंय. आईच्या उपजत पण सुप्तावस्थेत असलेल्या काव्यशक्तीला दादांमुळेच खतपाणी घातले गेले. याउलट दादांना लिहावयास आईनेच प्रोत्साहित केले. १९७० मध्ये रिटायर झाल्यावर सा.द. महाराष्ट्राचे संपादक कै.गं.गो. बिनिवाले यांनी संपादन करण्याविषयी आणि त्या साप्ताहिकात लिहिण्याविषयी विचारले तेव्हा दादा सुरुवातीला विशेष राजी नव्हते. आईच्या आग्रहामुळे ते लिहू लागले. आपण लिहितोय ते आईला मनापासून आवडतेय हे उमगल्यामुळेच दादा उत्साहाने लिहू लागले आणि मग ते त्या कामात रमून गेले. एक लेखक म्हणून त्यांना स्वतःची ओळख पटली; अर्थात इतरांना पटलेली होतीच ही गोष्ट त्यांच्या अग्रलेखावरील येणाऱ्या उत्स्फुर्त प्रतिक्रियांवरुन प्रतीत होत होतीच.

 'काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम्' या उक्तीनुसार रसिकतेने जीवनाच्या विविध अंगांकडे पाहण्याची दृष्टी दादांमुळे आईला लाभली. एखादा दिवाळी अंक आलाय. त्यातील उत्तम कथा, लेख वा कविता दादा मोठ्या आवाजात वाचून दाखवून आहेत आणि आई (ताई, नानांसह) तन्मयतेने ऐकत आहे, असे दृष्य आमच्या घरी अनेकवार दिसत असे. त्यामुळे उत्तमोत्तम साड्या वा दागदागिने या स्त्रीसुलभ गोष्टींमध्ये आईला फारसा रस कधीच नव्हता. सुरुवातीला गरीबीमुळे आणि नंतर सुस्थिती आल्यानंतर, त्यातील वैय्यर्थ जाणवल्यामुळे. चारच सोन्याच्या बांगड्या होत्या. त्या अडीअडचणीच्या वेळी आई नेहमी पुढे करीत असे. मदतीचा हात तर सदैव पुढे केलेला असे पण बांगड्यांचा हात पुढे होणे हे विशेष होते. १९६४ मध्ये घराच्या बांधकामावेळी एका अडचणीच्या प्रसंगी त्या चार बांगड्यांची आहुती गेली ती गेलीच. १९६६ मध्ये माझे लग्न झाले तेव्हा माझ्या मुंबईतील काकूंनी आणि आत्याबाईने, वरमाईच्या अंगावर काही नाही हे बरं दिसत नाही म्हणून बळे बळे आईच्या अंगावर आपले चार दागिने चढविले. त्यांचे मन मोडायचे नाही म्हणून आईने ते अंगावर घातले आणि काम संपताक्षणी चटकन उतरवले !

 दुर्देवाची गोष्ट अशी की आई दादांचे भावजीवन खऱ्या अर्थाने फुलायला सुरुवात झाली, तशी परिस्थितीची अनुकूलता आली तेव्हा आईला या जगाचा निरोप घेण्याची वेळ आली. ६० व्या वर्षीच. शाळेतून निवृत्ती पत्करल्यावर अवघ्या दोन वर्षातच. रिटायरमेंट घेतल्यावर शैक्षणिक क्षेत्रात तिने आणि तिची बालमैत्रिण,

(२१)