पान:पुत्र सांगे.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनःस्तापाखेरीज काहीच पदरी पडलं नाही. नाना आणि सुशा मावशी तर दादांना पितृस्थानी मानत. दादांच्या अखेरच्या दिवसात नानाने दादांची मनोभावे सेवा केली. डोंबिवलीत हॉस्पिटलमध्ये असताना दादांच्या तोंडी नाना आला कां ? सुशा आली कां ? अशीच विचारणा असे. सुशामावशीने पण दादांविषयीची कृतज्ञता म्हणून वाईजवळील आसरे गावच्या शाळेला त्यांच्या नावाने देणगी दिली होती.

 या सर्वांचा संसार सहकारी तत्वावर होता. येणारा खर्च आई, दादा, नाना आणि ताई असा सर्वामध्ये सम प्रमाणात विभागला जायचा. मी आणि माझा भाऊ रवी ही दोन्ही मुले सर्वांचीच होती. वास्तविक ताई, नाना, दादा यांच्याकडे, प्रत्येकाकडे येणारे पाहुणे, परिचित मित्रगण, भिन्न स्वरुपी होते. पण सर्वाचे स्वागत या आगळ्या वेगळ्या, एकत्र कुटुंब पध्दतीत समान पातळीवर होई. सख्ख्या भावंडांची एकत्र कुटुंबपध्दती मोडकळीस येत असणाऱ्या कालखंडात, आमच्या घरातील हा संसार नमुनेदार होता, आदर्श होता. आमच्या शिवाजीनगर भागातील सर्वच शेजाऱ्यापाजाऱ्यांना या गोष्टीचे कौतुक होतेच पण त्या काळातील सुप्रसिध्द पत्रकार, सांगलीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष कै. बापूसाहेब दप्तरदार आवर्जून ह्या कौतुकाचे मोठे उद्गाते होते. अनेकांना ते या एकत्र कुटुंबाचे उदाहरण देत असत.

 आई दादांच्या सहजीवनाचा मला जाणवणारा आणखी एक विशेष म्हणजे त्या उभयतांना असलेला एकमेकामधील गुणांचा आदर. आईचा न्यूनगंड कसा निघून गेला आणि दादांच्या सहवासात आईचे व्यक्तिमत्व कसे विकसित होत गेले याचा उल्लेख यापूर्वी आला आहेच. दादांना स्वत:ला शास्त्रीय संगीतात अजिबात रस नव्हता पण आपली पत्नी त्यात चांगली रुची बाळगून आहे, नव्हे त्यात तिला चांगली गती आहे, हे लक्षात आल्यावर, पुण्याहून तिच्यासाठी हार्मोनिअम आणणे, चांगला तंबोरा आणणे, नियमित शिकवणी ठेवणे या सर्व गोष्टीमध्ये त्यांनी मनापासून रस घेतला.

 आईच्या ठायी वाङमयीन जाण दादांमुळे विकसित झाली. केशवसुत, बालकवि, कविवर्य तांबे, माधव ज्युलियन, रे. टिळक असे दादांचे आवडीचे खास कवी होते. त्यांच्या पाठ्यपुस्तकातील कवितांचे मर्म दादा आईला समजावून देत. त्याचा आईला शाळेत शिकवायला फार उपयोग होत असे. शिक्षकी पेशा हे दोघांचे समान व्रत होते आणि त्या धाग्यांनी ते एकमेकांशी घट्ट बांधले गेले होते. परिस्थितीमुळे त्या दोघांना शिक्षकी पेशा पत्करावा लागला होता ही गोष्ट खरी पण

( २० )