पान:पुत्र सांगे.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवहारशून्य आणि पराकोटीचे माणूसघाणे होते. आई अत्यंत मितभाषी, समन्वयवादी, आणि कमालीची सोशिक होती. 'यथा काष्ठं च काष्ठं' मध्ये वर्णन केलेल्या प्रवाहातील दोन ओंडक्यांप्रमाणे त्यांची भेट झाली. दोघांची गरीबी एकमेकांस 'पुरुन उरणारी होती. प्राक्तनाचा तडाखा बसल्यामुळे दोघेही भुईसपाट झाले होते. दैवगतीनेच त्या दोघांना एक समान पातळीवर आणून ठेवले होते. अशा वेळी आजूबाजूच्या काही शिक्षक मंडळीनी दोघांची गाठ घालून दिली. नियती कुजबुजली असेल, की आता एकमेकांचा आधार घ्या. त्यातच तुमचे कल्याण आहे.

 संस्थानी काळात पगार फार तुटपुंजे होते. आई दादांना थोडे फार आर्थिक स्वास्थ्य मिळू लागले ते स्वातंत्र्योत्तर काळात. सुरवातीच्या काळात त्यांना शहापूर (बेळगांव) कवठे महांकाळ अशा ठिकाणी नोकऱ्या कराव्या लागल्या. नंतर माझ्या थोरल्या बहिणीच्या बालपणातच झालेल्या निधनानंतर, आई-दादांना सांगलीत बदली मिळाली. वास्तविक दोघांना वेगळे बिऱ्हाड मांडून राहणे अशक्य नव्हते. पण त्यावेळी आईच्या माहेरी अगदी दयनीय अवस्था होती. व्यापारात बसलेल्या फटक्यानंतर कोर्ट- जप्ती प्रकार तर झालेच. सर्वत्र बेअब्रू झाली होती. त्या मानसिक आणि आर्थिक घालमेलीच्या काळात त्या कुटुंबाला पुरुषमाणसाच्या सोबतीची आवश्यकता होती. आईची आई वृध्द होती. (नंतर तिचे लवकरच निधन झाले) आईची थोरली बहिण ताई बालविधवा. सर्वाचा भार तिच्या शिरावर होता. नाना (वसंतराव हेबाळकर) लहान होता, आणि त्याखालची सुशीला आणखीनच लहान होती. दादांना त्यांचे स्वतःचे नातेवाईक कोणी नव्हते ही गोष्ट खरी असली तरी त्यांना स्वतंत्रपणे राहायला नक्कीच आवडले असते ! पण दादांनी, आईची सुख-दुःखं तीच आपली सुख-दुःखं मानली आणि हेबाळकर - ब्रम्हनाळकरांच्या मोडतोड झालेल्या वाहनाचे कर्तव्यबुध्दीने चालकत्व पत्करले ! आई दादांच्या सहजीवनातील हे विचारी सामंजस्य होते. आईला त्यामुळे मोठाच आधार मिळाला आणि आपल्या नवऱ्याच्या समजूतदारपणाची जाण अखेरपर्यंत तिच्या मनात सजग राहिली, आणि आईच्याच कां तर सर्वच भावंडाच्या ताई, दादांना भाऊ मानू लागली. दादा अखेरपर्यंत दिवाळीत तिला भाऊबीज घालत. ताई बालविधवा होती. तिच्या सासरचा जमीन जुमला होता. कायद्याप्रमाणे त्यातील कांही वाटा रास्तपणे तिला मिळायला हवा होता. तसा तो मिळता तर सर्वाचेच दैन्य दूर झाले असते. दादांनी वकिलांमार्फत कोर्ट कचेऱ्या केल्या पण वकिलाच्या फी खेरीज आणि

(१९)