पान:पुत्र सांगे.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यापोटी कांही दिवस त्या सज्जन माणसाला बहिष्कार पण सहन करावा लागला." ७०-७५ वर्षापूर्वीच्या जुन्या चालीरीतींचा विचार करता, आमच्या दादांनी मोठेच धाडस केले होते. त्या काळात क्रांतिकारी समाजकार्यकर्ते म्हणून प्रसिध्द असलेल्या बुधगांवच्या डॉ. बापटांची दादांवर विशेष मर्जी होती. दादांच्या हलाखीच्या दिवसात त्या डॉक्टरांनी आग्रहाने दादांना आपल्या घरात ठेवून घेतले होते. पित्याची माया दिली होती. त्यांच्या उदारमतवादी स्वभावाची दादांवर छाप पडली होती. त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन दादांच्या ठायी आला होता. दादांच्या या उदारमतवादी स्वभावाची छाप आमच्या आईवर पूर्णपणाने उमटली होती. या वस्तुस्थितीचा प्रत्यय मलासुध्दा आला. माझ्या पुस्तकाच्या संदर्भातच, पंचमुखी मारुती मंदिराच्या परिसरात हिंडत असताना, हरिजनवाड्यात, गोल्लांच्या वस्तीत जाऊन, स्वत: आंब्याची डाळ करुन आणून, हळदीकुंकुवाचे समारंभ करणाऱ्या, साक्षरतेचे वर्ग चालवणाऱ्या आईचा, मी मुलगा आहे हे तिथल्याच काही जणांच्या गप्पात उघड झाले. मग मला सहकार्याचे अनेक दरवाजे उघडे झाले !

 असे अनेक अनुभव आले.

 आपल्या आई-दादांनी निर्हेतुकपणे जी चांगुलपणाची पेरणी केली त्याची फळे आपल्याला चाखायला मिळत आहेत ही कृतज्ञतेची भावना मनात घर करुन राहिली. पण त्याचबरोबर या मिळकतीचे उत्तरदायित्व आपल्यावर आहे ही वस्तुस्थिती मला अस्वस्थ करत होती. आपण काही धनवान नाही. कुठे मोठी देणगी देऊन स्मारक करावे ही शक्यता नाही. आपल्याला थोडीफार लेखनकला अवगत आहे तेव्हा त्या दोघांची शब्दपूजा बांधावी इतके मात्र मी मनाशी ठरवले. म्हणजे थोड्या कर्तव्यबुध्दिने मी कामाला लागलो तरी एक गोष्ट मला जाणवली. ती अशी की आई-दादांविषयी आवर्जून सांगावं असं काही निश्चितच त्यांच्यामध्ये होतं.

 इथं मला जाणवलं ते त्या उभयतांचे समंजस सहजीवन.

 सर्वसामान्य परिस्थितीत आई आणि दादांच्या पत्रिका एकमेकांकडे जाऊन त्यांचे लग्न कधीच झाले नसते. म्हणजे देशस्थ कोकणस्थ हा जातीचा त्याकाळचा अडसर होताच. पण त्यापेक्षा त्या उभयतांमध्ये अनेक तफावती होत्या. दादा अगदी कोकणस्थी गोरेपान, धारदार नाकाचे आणि प्रथमदर्शनीच छाप पडावी अशा व्यक्तिमत्वाचे होते. आईची परिस्थिती अगदी उलट होती. स्वभावाने दादा ( त्यानींच एका लेखात लिहिल्याप्रमाणे) सुरुवातीला तरी फटकळ, वृत्तीने तुसडे,

(१८)