Jump to content

पान:पुत्र सांगे.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अलीकडे कांही वर्षे मला अस्वस्थ करत होती. तसे कांही तुरळक लेख मी दादांच्या निधनानंतर 'दक्षिण महाराष्ट्र' साप्ताहिकातून लिहिले होते. पुण्याच्या 'विपुलश्री' मासिकाने, 'माझी आई' या विषयावर एक स्पर्धा आयोजित केली होती. तेव्हा आईवर लिहिलेल्या माझ्या लेखाला पारितोषिक प्राप्त झाले होते. दादा गेल्यानंतर त्यांचे दिवस वगैरे आम्ही सांगलीत केले होते. त्यावेळी असंख्य माणसे भेटून गेली. सर्वजण आई-दादांविषयी खूप भारावून बोलत होते. मृतांविषयी सर्वच जण चांगलं बोलतात, भलावण करतात अशीही माझी त्यावेळी कांही भावना असेल. नंतर नोकरीच्या काळात मुंबईच्या चक्रात तो सगळा विषय मनातून केव्हाच विरुन गेला होता.

 १९९६ मध्ये मुंबईच्या ३५ - ३६ वर्षाच्या वास्तव्यानंतर मी सांगलीत परतलो. आई-दादांच्या कर्मभूमीत आल्यावर त्यांच्या विषयीच्या मला माहित नसलेल्या अनेक गोष्टी परिचित होऊ लागल्या. 'सांगली आणि सांगलीकर' पुस्तक लिहिण्याच्या खटाटोपाला मी लागलो तेव्हा स्वतः लेखक असलेला माझा मामा (नाना) आणि त्या क्षेत्रातील कांही मंडळी म्हणाली की एकट्या माणसाला हे काम करायला ५-१० वर्षे सहज लागतील. त्यापेक्षा एखादे संपादक मंडळ नेमावे आणि कामे वाटून घ्यावीत. मला स्वतःला ती कल्पना आवडली नाही कारण डोंबिवलीचा इतिहास लिहिणाऱ्या संपादकमंडळीचे काम किती रेंगाळत आहे हे मी नुकतेच डोंबिवलीच्या माझ्या निवासकाळात अनुभवलेले होते. त्यामुळे त्या विषयावर फारसे कांही न बोलता, कांही कौटुंबिक अडचणींचा सामना करत मी अवघ्या तीन वर्षातच, 'सांगली आणि सांगलीकर' पुस्तकाचे काम तडीस नेले.

 आणि ही कार्यसिध्दी केवळ आई दादांच्या पुण्याईने आणि त्यांच्याविषयी या परिसरातील लोकांच्या मनात वसत असलेल्या श्रध्देपोटीच शक्य झाली.

 ज्या ज्या व्यक्तिंकडे वा संस्थांकडे मी माहिती मिळवण्यासाठी वा पुस्तकाच्या अन्य कामासाठी गेलो, तिथे बोलता बोलता तुम्ही इंदुताईचे पुत्र ना, ? टिळकसरांचे चिरंजिव ना? हा परिचय निघाला, तेव्हा त्या त्या मंडळींनी मला अपेक्षेपलिकडे मदत केली, मार्गदर्शन केले, संदर्भ सांगितले, अनेक शॉर्ट कट्स दाखवून दिले. त्या भरघोस मदतीमुळेच माझं काम अपेक्षेपेक्षा लौकर पार पडलं. बुधगांव कौलापूरसारख्या अनोळखी भागात हिंडत असताना, दादांच्या आठवणी सांगताना एकजण गहिवरुन म्हणाला, "अहो त्या देवमाणसानं आमच्या महार मांगांच्या वस्तीवर जाऊन, गरज होती म्हणून एका मयताला खांदा दिला होता हो.

(१७)