सकाळी माझ्या हौसिंग सोसायटीमध्ये राहणारे माझे पत्रकार मित्र दादा पांडे यांनी कांही पत्रकारांना मुद्दाम बोलावले होते. त्यांच्यासमवेत चहापान आणि गप्पागोष्टी झाल्या. साप्ताहिक विवेकचे श्रीपादराव पटवारी आणि 'मुंबई तरुण भारतचे' सुधीर जोगळेकर, लोकसत्तेचे उपसंपादक श्रीधर जोशी यांच्याशी, दादांची पत्रकारितेसंबंधात दिलखुलास बातचीत झाली.
तोच त्यांच्या आयुष्यातील अखेरचा वाढदिवस.
त्यानंतर त्यांची तब्येत अधिकाधिक खालावतच गेली. एकदा संध्याकाळी जवळपास कोमात गेल्यासारखी अवस्था झाल्यामुळे, खुर्चीत बसवून त्यांना जिन्यातून खाली आणावे लागले आणि मग डोंबिवलीतील त्या काळातील उत्तम आणि निष्णात असलेल्या डॉ. राव यांच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले. पाच दिवस तसे बरे गेले. डॉक्टरांनी सांगितले म्हणून सांगलीला नाना-ताईना, ब्रम्हपुरीला खीला आणि पुण्याच्या सुशामावशीला निरोप दिले. २१ जुलै हा मुंबईतील तसा चिंब पावसाळी दिवस. सकाळी सातच्या सुमारास सुमनने त्यांना चहा आणि बिस्किट भरविले. चहा पोटात गेला पण बिस्किट गिळणे काही त्यांना जमले नाही. “रवी आला का ? नाना आला का ? चारु आली कां ?" अशी पृच्छा अत्यंत क्षीण आवाजात त्यांनी केली. त्यानंतर मात्र ते पूर्णपणे ग्लानीत गेले. श्वास मंद मंद होऊ लागला जवळ जमलेल्या नातेवाईकांपैकी माझ्या आत्याने आणि तिच्या भाचीने (ती नर्स होती) सकाळी दहाच्या सुमारास मला दादांचे मस्तक मांडीवर घेण्यास सांगितले तेव्हा अशुभाची कल्पना येऊन मला भडभडून आले. नर्स तिथे होतीच. घरातून आणून ठेवलेले गंगाजळ घालण्याचा थोडासा प्रयत्न केला. नर्सने बरोबर दहा वाजून ५ मिनिटांनी, दादांचे अर्धवट ग्लानीत असलेले डोळे पूर्णपणे मिटले आणि सारं काही संपलं आहे अशा अर्थाची खूण केली.
रविवार असल्याने माझ्या सोसायटीमधील सहकारी, नातेवाईक मंडळी, मित्रजण जमले होतेच. संध्याकाळपर्यंत रवीची वाट पाहाण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे अनेक अडचणींना तोंड देत, तो चारु आणि मंदार - मधुरासह डोंबिवलीत पोचला. त्यामुळे त्याला अंत्यदर्शन घेता आले. दादांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील माखजनजवळील आंबवचा, बालपण कोल्हापूरात, कर्मभूमी सांगली आणि त्या कशाचाही संबंध नसलेल्या डोंबिवलीत त्यांना अखेरचा श्वास घ्यावा लागला.
एक अध्याय संपला.
आपल्या आई-वडिलांविषयी आपण कांहीतरी लिहिलं पाहिजे. मला जाणवलेली त्यांची थोरवी शब्दबध्द करुन इतरांना सांगितली पाहिजे अशी उर्मी