पान:पुत्र सांगे.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याच वयाची तर नाना (वसंतराव हेबाळकर) साठी पार केलेला. ताई, नाना सांगली सोडणं शक्य नव्हतं. इतके त्यांनी सामाजिक व्याप मागे लावून घेतले होते. आई गेल्यानंतर दादांनी सार्वजनिक व्याप सोडून दिले होते. द. महाराष्ट्राचे संपादनकामही त्यांनी सोडलं होते. फक्त त्यामध्ये अधून मधून लेख मात्र लिहित असत. तेवढं काम तुम्ही डोंबिवलीत राहून करु शकाल, एवढी खात्री दिल्यावर ते शेवटची दोन वर्षे माझ्याकडे येऊन राहिले होते. डोंबिवलीत त्यांचे मन रमणे शक्यच नव्हते. आमचं मुंबईचं जीवन धकाधकीचं, घड्याळ्याच्या काट्यावर चालणारं. इच्छा असूनही मनमोकळ्या गप्पा रविवारशिवाय होत नसत. पण दादांची तक्रार नव्हती. दृष्टी अधू झाल्यानं, पहिल्यासारखं वाचन जमत नसे. मात्र एक गोष्ट चांगली होती. डोबिंवलीच्या आमच्या घरी माणसांचा राबता खूप होता. दादांचे समवयस्क नातेवाईक, कांही परिचित, माझं मित्रमंडळ, सुमनच्या मंडळातील मैत्रिणी अशा माणसांच्या येण्याजाण्यात त्यांच्या गप्पा होत असत. दादा माझ्या मुलाला इंग्रजी शिकवत. एरवी त्यांचा रेडिओ बी.बी.सी. असे. बी.बी.सी. वरील बातम्या आणि वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यात त्यांचा वेळ चांगला जाई. मध्यंतरी मी त्यांना घेऊन ब्रम्हपूरीला रवीकडे गेलो होतो. जन्मल्यापासून तो सांगलीतच होता. चाळीस वर्षात प्रथमच सांगलीतून बाहेर पडून त्यानं ब्रम्हपूरीसारख्या दूरवरच्या ग्रामीण भागात स्वतंत्रपणे बिऱ्हाड मांडले होते. चारु- रवीचा संसार बघून दादा अगदी खुश झाले. अर्थात तिकडच्या प्रखर उन्हाळ्यात आणि कडाक्याच्या थंडीत तिथं राहाणं त्यांना शक्यच नव्हतं.

 १९८३ पासून दादांना प्रोस्टेड ग्लॅड्सचा त्रास होता. नंतर छातीत न्युमोनियाचा पॅच तयार झाला होता. सांगलीला डॉ. पुरोहित आणि डोंबिवलीला डॉ. राव यांच्या हॉस्पिटलमध्ये दादांना एकदोनदा अॅडमिट केले होते. पण ऑपरेशन करुन ते दोष दूर करणे त्यांच्या खंगलेल्या शरीरप्रकृतीच्या दृष्टीने कठिण होते आणि त्यापेक्षा खरं म्हणजे दादांनाच ते कांही नको होतं. स्ट्राँग अँटिबायोटिक्स आणि इंजेक्शनस्चा मारा यावरच त्यांची शेवटच्या दीड-दोन वर्षातील वाटचाल चालू होती. त्यांनी १४ सप्टेंबर १९७४ रोजी पंचाहत्तरीत प्रवेश केला तेव्हा सकाळी त्यांची आवडती चाफ्याची फुलं घेऊन आणि पुष्पगुच्छ घेऊन मी, सुमन, मंजिरी आणि मकरंद त्यांच्या अभीष्टचिंतनासाठी त्यांच्या कॉटजवळ उभे होते. त्यांच्या डोक्यातून घळाघळा अश्रू वाहात होते. आमची आई करायची तसा खरपूस केक सुमनने बनविला होता. थरथरत्या हातांनी दादांनी तो कापला.

(१५)