पान:पुत्र सांगे.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते तसेच त्यांचे संबंध 'दक्षिण महाराष्ट्र' या साप्ताहिकांबरोबर जडले. त्या साप्ताहिकाचे संपादक कै.गं.गो. बिनिवाले दादांचे जुने स्नेही. त्यांच्या स्नेहाखातर दादा नियमितपणे त्या साप्ताहिकात लिहू लागले. ही गोष्ट १९७१-७२ नंतरची. म्हणजे दादा शाळेच्या कामातून पूर्णपणे निवृत्त झाल्यानंतर काही वर्षे त्यांनी संपादक या नात्याने पण या साप्ताहिकाची धुरा वाहिली. या कामाने त्यांना खूप आनंद दिला. तरुणपणी कोल्हापूरात 'विद्याविलास' साप्ताहिकात कांही काळ त्यानी काम केले होते. त्यांची भाषा अत्यंत डौलदार होती. टिळक-आगरकर- चिपळूणकर अशा जुन्या जमान्यातील पत्रकारितेशी नातं सांगणारी होती. त्यांचे अनेक अग्रलेख खूप गाजले. मोठमोठ्या पुढाऱ्यांना, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना त्या अग्रलेखांची दखल घ्यावीशी वाटे. एका प्रतिष्ठित कविवर्यानी हिंदु देवतांचा अवमान करणारी एक कुप्रसिध्द कविता लिहिली त्याबद्दल दादांनी खरमरीत टीका केली होती. सांगलीच्या गणेश भक्तांनी दादांना जोरदार पाठिंबा दिला. निषेधाच्या पत्रांचा पाऊस पडला आणि अखेर त्या कविश्रेष्ठांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. आताच्या केंगणेश्वरी परिसरात सिनेमा थिएटर उभारण्याची योजना संबंधितांनी आखली तेव्हा त्या गोष्टीला दादांनी द. महाराष्ट्रातून कडाडून विरोध केला. वाचकांमध्ये जागृती केली आणि अखेरीस ती योजना बासनात बांधली गेली. साहित्य आणि साहित्यिकांविषयीचे त्यांचे अग्रलेख विशेष बोलके असत. लेख लिहिण्यापूर्वी दादा खूप कष्ट घेत. संदर्भ गोळा करीत. त्यासाठी सांगली नगरवाचनालयाच्या जवळीकेचा त्यांना खूप फायदा झाला. पुणे-मुंबई- डोंबिवली वगैरे ठिकाणी गेलेले असले तरी द. महाराष्ट्राचा लेख पाठविण्याची दादांची लगबग, तत्परता वाखाणण्यासारखी होती. त्या कामात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. आमचे एक नातेवाईक आणि पुण्याच्या केसरीचे सहसंपादक कै.मा.वि. साने (ते अखिल भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष होते.) एकदा मला गहिवरुन म्हणाले ‘तुझ्या रामकृष्णाकडे फार मोठी पोटेंशिअल होती. पुण्या- मुंबईकडे असता तर त्याला अधिक मानमरातब लाभला असता.' दादांच्या मृत्युनंतर वृत्तपत्रातून जे मृत्युलेख आले त्यामध्ये अशा प्रकारचीच भावना व्यक्त झाली होती.

 माझ्या धाकट्या भावाची, रवीची बदली १९८३ मध्ये नागपूरजवळील ब्रह्मपूरीला झाली. त्यावेळी दादांचे वय ७३ वर्षाचे होते. खूप थकलेले होते. रवीचे बिन्हाड ब्रम्हपूरीला हलल्यामुळे घरात वृध्दाश्रमच झाला होता. ताई जवळपास

(१४)