पान:पुत्र सांगे.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पन्नाशी आली असताना दादांनी बाहेरुन बी. ए. केले. नंतर एम. ए. केले.

 दादांना सामाजिक कामांची आवड होती. सहकार हा तर त्यांच्या खास आवडीचा विषय होता. त्या विषयावर त्यानी बरेच स्फुट लेखनही केले. सांगलीच्या शिक्षक सहकारी पतपेढीच्या आद्य संस्थापकांपैकी ते एक प्रमुख सदस्य होते. अनेक वर्षे ते त्या संस्थेचे कार्याध्यक्ष होते. सांगली शहर माध्यमिक शिक्षक संघटनेचेही ते अध्यक्ष होते. संस्थानकालीन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते एक संचालक होते. सांगली (जिल्हा) नगरवाचनालयाच्या कार्यकारिणीवर ते चुरशीची निवडणूक लढवून निवडून आले होते. नंतर त्या संस्थेचे ते कार्यवाह झाले आणि अध्यक्षही झाले. त्या काळात त्यांनी अनेक उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. ग्रंथालय परिषदेचे सांगलीत आयोजन करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. सांगली नगरवाचनालय ही संस्था आर्थिक दृष्ट्या पूर्णतया स्वावलंबी व्हावी म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले. या संस्थेवर त्यांचे विलक्षण प्रेम होते. संस्थेच्या सेवकांना मिळणारे वेतन पुरेसे नाही याची नेहमी त्यांना खंत वाटे पण यासाठी वैयक्तिकपणे आपण कांही करु शकत नाही याची त्यांना जाणीव होती. आपल्या मृत्युपत्रात एक अल्पशी देणगी त्यांनी नगरवाचनालयाच्या सेवकांसाठी राखून ठेवली होती. अखेरच्या काळात फक्त वाचक या नात्यानेच त्यांचा संस्थेशी संबंध असला तरी अडीअडचणीच्या काळात ते संस्थेच्या कामासाठी धावून जात असत. संस्थेला एकदा आर्थिक अडचण होती. त्यावेळी कै. वसंतदादा पाटील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. दादांचे ते विद्यार्थी होते. सांगलीत किंवा मुंबईत त्यांना भेटणे अवघड. वसंतदादा महाबळेश्वर मुक्कामी आहेत असे कळल्यावर नगरवाचनालयाच्या संचालक मंडळींनी दादांना गळ घातली की वसंतदादांकडे शब्द टाकण्यासाठी त्यांनी संचालकांबरोबर जावे. आमच्या दादांची प्रकृती तितकीशी चांगली नव्हती. ही घटना आहे एप्रिल १९८४ मधील (१९८५ ला दादांचे निधन झाले.) संस्थेच्या कामासाठी वसंतदादांना भेटणे आवश्यक आहे हे जाणवल्यावर, वैयक्तिक कामासाठी त्यांच्याकडे कधीही न जाणारे आमचे दादा. नगरवाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर महाबळेश्वरास गेले. वसंतदादांना सर्व कांही सांगितलं. त्यांनी ताबडतोब कारवाई केली हे सांगायला नकोच. पण आमच्या दादांची अस्थिपंजर अवस्था पाह्न मुख्यमंत्री असलेले वसंतदादा कळवळून म्हणाले 'गुरुजी कशाला एवढी दगदग केलीत ? नुसती चिठी पाठवली असतीत तरी चाललं असतं.'

 सांगली नगरवाचनालयाशी जसे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध (उभयपक्षी)

(१३)