पान:पुत्र सांगे.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असावा. त्यातून आईसारख्या देशस्थांच्या मुलीशी लग्न झाल्यानंतर दादा आपल्या नातेवाईकांपासून आणखीनच बाजूला पडले असतील किंवा दादानी मुद्दामच स्वतःला बाजूला ठेवलेलं असावं. याच कारणामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत कुणा नातेवाईकाकडे जाण्यापेक्षा दादा बऱ्याच वेळा आम्हाला माथेरान महाबळेश्वरला परवडेल त्या हॉटेलामध्ये किंवा हॉलिडे कॅम्पमध्ये घेऊन जात असत. आम्हाला मात्र सांगत. आई वर्षभर काम करुन दमते. कोणाच्या घरी जाऊन राहिलं तर आईला रितीनुसार थोडं फार काम करावंच लागेल. तिला विश्रांती मिळणार नाही. म्हणून आपण हॉटेलमध्ये जायचं. त्या सांगण्यामधे तथ्य निश्चितच होतं. नोकरीनिमित्त मी मुंबईला स्थायिक झाल्यानंतर मात्र दादांच्या नातेवाईकांशी आमचे संबंध नव्याने जुळून आले; आणि उभयपक्षी जिव्हाळ्याचे झाले.

 संस्थानी काळात दादांनी कौलापूर, कवठेमहाकांळ आदी ठिकाणी, नोकरी केली. सांगली संस्थानच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये मराठीचे अध्यापक म्हणून त्यांनी कांही काळ काम केले. त्यानंतर सांगली हायस्कूलमध्ये त्यांची माध्यमिक शिक्षक म्हणून बदली झाली. तिथं त्यांनी निवृत्त होईपर्यंत काम केले. अनेक विषय शालेय जीवनात शिकविले. भाषाविषयांशिवाय अंकगणितही ते आवडीने शिकवत. कांही काळ सांगली हायस्कूलमध्ये अर्धमागधी विषय (हा संस्कृतला पर्यायी विषय होता.) शिकविण्यासाठी कोणीच शिक्षक उपलब्ध नव्हते. तत्कालीन हेडमास्तर श्री अमलाडी यांची दादांवर विशेष मर्जी होती. त्यांच्या शब्दासाठी दादांनी अर्धमागधीचा अभ्यास केला आणि संस्कृत न घेणाऱ्या मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांना ते अर्धमागधी शिकवू लागले. सगळे विषय शिकवून झाले तरी दादांची पहिली आवड इंग्रजी हीच होती. इंग्रजी वाङमयाचे त्यांचे वाचन प्रचंड होतेच पण इंग्रजी ग्रामर हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता. एखादी कादंबरी वाचावी इतक्या अधीरतेने त्यांचे ग्रामरचे वाचन चाले. त्यांच्या एका शिक्षक बांधवांने आठवण सांगताना सांगितले की, त्यांनी एकदा इंग्रजी ग्रामरमधील कांही शंका विचारली. दादांनी ताबडतोब त्यांच्या शंकेचे निवारण केले. इतक्या सहजपणे केले की किंचितकाल त्या शिक्षकाचा विश्वास बसेना. मग दादांनी नेसफिल्डच्या ग्रामरच्या अमुक पानावर अमुक परिच्छेद वाचा म्हणजे तुमच्या शंकेचे निवारण होईल असे त्या शिक्षकास सांगितले आणि अगदी तसेच होते ! त्यांच्या संग्रही २५-३० तरी उत्तम अशी इंग्रजी ग्रामरची पुस्तके होती. पुणे विद्यापीठाची बहि:शाल योजना सुरु झाली. कॉलेजात न जावे लागता बाहेरुन पदवी परीक्षेला अनुमती मिळाल्यावर, वयाची

(१२)