पान:पुत्र सांगे.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दादांचं कुणीच आम्ही बघितलं नाही. त्यांचे वडील लहानपणीच वारले. गिरगांवात कुठे तरी त्यांचे दुकान होते असे केव्हातरी मी ऐकले. त्या दुकानात खूप नुकसान सोसावे लागले. त्यापायीच त्यांचा अकाली मृत्यू झाला असावा. दादांची आई त्यानंतर आपल्या एकुलत्या एक मुलाला घेऊन कोल्हापूरच्या शुक्रवारपेठेतील मोठ्या दगडी वाड्यात आली. (तो दगडी वाडा माझ्या लहानपणी मी एकदाच बघितला होता.) तिथं टिळकांचं एकत्र कुटुंब होते. दादांचे एक चुलते कोल्हापूर संस्थानात मोठे न्यायाधिकारी होते. त्यांना न्यायला आणायला संस्थानची बग्गी येत असे. त्यांना रावबहाद्दूर असा किताब होता असं ऐकल्याचेही मला आठवतंय. दादांच्या आईला माहेरचाही तसा भक्कम आधार नसावा. टिळकांच्या एकत्र कुटुंबात अश्रिताचे जिणे तिला नक्कीच मानवत नसणार. पण निरुपाय होता. दादा शालेय जीवनात अत्यंत कुशाग्र बुध्दिचे होते. इंग्रजी विषयाची त्यांना खूप आवड होती. मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना त्या विषयातील 'दादासाहेब पावगी' पारितोषिक मिळाले होते. मात्र अत्यंत प्रतिष्ठेचे असलेले 'चॅटफिल्ड प्राईज' केवळ एक माकनि हुकले होते. त्याबद्दलची हळहळ मात्र त्यांच्या तोंडून बरेचदा व्यक्त झाली होती. बस, त्यापलीकडे आपल्या बालपणीच्या जीवनाचा कोणताही उल्लेख सहसा त्यांच्या तोंडून कधी ऐकायला मिळाला नाही. आम्ही पण असे करंटे की त्याबद्दल कधी काही विचारलं नाही. आम्ही आमच्यातच इतके मशगुल की दादांच्या मोठेपणाची जाणीव त्यांच्या मृत्यूनंतरच आम्हाला प्रकर्षाने झाली. विशेषत: मुंबई दूरदर्शनने आपल्या संध्याकाळच्या मराठी बातम्यात त्यांच्या दुःखद मृत्यूची बातमी सांगितल्यावर !

 मॅट्रिकची परिक्षा झाल्यावर दादा कोल्हापूरच्या एकत्र कुटुंबातून आपल्या आजारी आईला घेऊन बाहेर पडले ते सांगलीत आले. सांगली संस्थानात त्यांना प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळाली. आपल्या आजारी आईची सेवा करत ते दिवस काढू लागले. पण आई फार काळ जगली नसावी. कारण दादा लग्नाच्या वेळी अगदी एकटे होते. आपली शाळा आणि आपले वाचन यामध्येच त्यांनी स्वत:ला कोंडून ठेवले होते. गरीबीमुळे त्यांची आई आणि स्वतः दादा यांच्यामध्ये एक प्रकारची न्यूनत्वाची भावना आलेली असावी. त्यापोटीच त्यांनी आपले मुंबईकडील सु:स्थितीतील असलेले नातेवाईक वा अन्य परिचित यांजकडे कधी चुकून बघितले नाही. संपर्क साधला तर 'आला मदत मागायला' असा चुकीचा ग्रह कुणी करुन घेतला तर काय घ्या ? असाही विचार दादांच्या मनात नेहमी सजग

(११)