पान:पुत्र सांगे.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आयुष्यभर दगदग केली. बालपणी शरीराची आबाळ झाली. आपल्या शरीराच्या तक्रारीविषयीं ती क्वचितच तक्रारीचा सूर लावे. निदान आपल्या दिनचर्येत त्याचा फारसा व्यत्यय येऊ देत नसे. ऐन कॅन्सरच्या आजारातसुध्दा फार धैर्याने तिने त्या जीवघेण्या दुखण्याचा सामना केला. तिच्या दुखण्याच्या कांही दिवसच आधी तिची जिवलग मैत्रीण, राजमती बाईच्या यजमानांना, म्हणजे नेमगौडदादांना कॅन्सर झाला होता. नेमगौडदादा हे राजमती बाईंचे यजमान होते, पण मुळात बाईंचे ते नात्याने सख्खे मामाच होते. लहानपणी आई, वखारभागात राहात असल्याने, ती, राजमती आणि नेमगौंडदादा एकत्र खेळत. मेळ्यात कामे करत. बँडपथकात एकत्र असत. त्यामुळे त्या तिघांमध्ये अत्यंत स्नेहमय, बंधुभावाचे नाते होते. नेमगौडदादांना कॅन्सर झाला तेव्हा आईसुध्दा मुळापासून हादरुन गेली. राजमतीला वेळोवेळी जावून धीर देणे, त्या उभयतांचे दुःख कमी व्हावे म्हणून हसतखेळत बोलणे अशा गोष्टी आई करत होतीच. अर्थात त्यातील फोलपणा त्या तिघांनाही माहित होता. पण यामुळे झाले काय, तर नेमगौंडदादांचा कॅन्सर जवळून बघितल्यामुळे, आपण कोणत्या 'स्टेज' ला आहोत, आता यापुढे कोणकोणत्या आणि कशा प्रकारच्या यातना आपल्यापुढे वाढून ठेवल्या आहेत, याची अचूक जाण आईला, स्वतःच्या कॅन्सरच्या आजारात होती. कुटुंबियांच्या केवळ समाधानासाठी ती उत्साह दाखवी. आपल्या दुःखाने इतरांच्या आनंदाला मर्यादा घालावयाच्या नाहीत असा एक दंडकच तिने स्वत:साठी घालून घेतला असावा. घशातून असंख्य काटे एकाच वेळी टोचावेत अशा वेदना होत पण मनाच्या विलक्षण निग्रहाने ते सर्व ती सहन करे. ३०-३५ वर्षापूर्वीच्या काळात कॅन्सरचा फैलाव तसा कमी होता आणि आजच्यासारखी पेन किलर्सही नव्हती. अशा पार्श्वभूमीवर कॅन्सरसारख्या दुर्धर आजारात आईने मनाचे विलक्षण असामान्यत्व दाखवले. त्यासंबंधात एखादे पूर्ण पुस्तक होऊ शकेल. पण त्याचे शब्दांकन करणेच क्लेशकारक आहे.

दादा

 मला दादांविषयी आठवताना मनात अत्यंत करुणा दाटून देते, आणि बरेच वेळा अपराधी वाटते. दादांच्या बालपणाविषयी आम्हाला काही म्हणजे काही माहित नाही. आई इथली सांगलीतीलच होती. तिची भावंडं होती. तसे

(१०)