पान:पुत्र सांगे.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वत:चा ओनरशिप ब्लॉक खरेदी केला. आम्ही सर्व कुटुंबिय (त्यात अर्थातच गंगूताई ब्रम्हनाळकर व वसंतराव हेबाळकर आलेच, आमची पुण्याची मावशी सुशीला अडके पण मुद्दाम आली होती. ) दिवाळी निमित्त माझ्या घरी एकत्र जमलो. आईच्या हातची खुसखुशीत चकली मनसोक्त खाल्ली. चिरोटे हा पदार्थ घरी फारसा केला जात नाही. आमची आई अतिशय सुरेख चिरोटे करत असे. अगदी मस्का खारं बिस्कीट वाटावं असे अनेकपदरी खुसखुशीत चिरोटा करावा तो आमच्या आईनेच. असे चिरोटे आणि कुरकुरीत अनारसे भरपूर खाऊन एकत्रित साजरी झालेली ती आम्हा कुटुंबियांची शेवटचीच आनंददायी दिवाळी ठरली.

 एप्रिल - मे १९७३ पासून तिचा घशाचा त्रास सुरु झाला. घास गिळणे त्रासदायक होऊ लागले. जूनमध्ये कॅन्सरचे निदान झाले. टाटा हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की ऑपरेशन कठिण आहे. पेशंटला झेपणार नाही. कांही इंजेक्शने दिली. अगदीच उपासमार होऊ लागली, तोंडावाटे पुरेसे अन्न पोटात जाईना अशी वेळ आली. आमचे फॅमिली डॉक्टर एस. बी. कुलकर्णी रोज घरी येत होतेच. शेवटी सुप्रसिध्द सर्जन डॉ. पी. जी. आपटे यांनी आईच्या पोटाला छोटेसे छिद्र पाडले. ट्यूब बसवली. त्यातून दूध, शहाळाचे पाणी असा अन्नपुरवठा सुरु झाला. पण असे किती काळ चालणार ? १७ सप्टेंबर १९७४ ला या दुखण्यानेच तिचा अंत केला. मला आठवतेय तशी आईची प्रकृती अतिशय सुदृढ अशी कधी नव्हतीच. माझ्या धाकट्या भावाच्या, रविच्या जन्मानंतर तर तिच्या पायातील ताकद जवळपास गेलीच होती. नोकरीवर हक्क रहावा म्हणून ठराविक मुदतीने तिला टांग्यातून नोकरीच्या ठिकाणी जाऊन सही करण्यापुरते न्यावे लागे. अक्षरश: उचलूनच. हेच दुखणे तिला वर्षभर छळत राहिले. नंतर किरकोळ आजार सतत असले तरी ती चांगली 'अॅक्टिव्ह' होती. १९५७-५८ पासून किंवा त्याच्या थोडे आधीपासून तिला कानाचा खूप त्रास झाला. त्रास आधी होताच. हरभट रोडवर डॉ. एस. बी. कुलकर्णी यांनी ई. एन. टी. स्पेशॅलिस्ट म्हणून दवाखाना थाटला तेव्हा आईच्या दुखण्याचे निदान झाले. कान खूप प्रमाणात दुखे, चेहरा सुजून जाई, वेळी-अवेळी ठणक्याचा त्रास होई. डॉक्टरांनी स्वतः खूप उपाय केले. तिची केस घेऊन आणखी तज्ञ डॉक्टरांचा सल्लाही घेतला पण पूर्णतया आजार कधी आटोक्यात आलाच नाही. मात्र आईचा डॉक्टरांवर संपूर्ण विश्वास होता. या प्रकारात तिचे लाडके गाणे मात्र कायमचेच बंद पडले.

( ९ )