पान:पुत्र सांगे.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आव्हान म्हणूनच आईने स्वीकारले हे आईचे वैशिष्ट्य. एरवी आता शेवटची चार वर्षे काढायची आहेत तर कशाला जिवाचा आटापिटा करायचा असा सोयीचा विचार तिने केला असता तर ते तिला क्षम्य ठरले असते. पण तसे कधी झालेच नसते. पहिल्या दिवसापासून आईने कंबर कसली. त्यासाठी तिने आधी मुलींच्या आयांना हाताशी धरले. शेतातून राबणाऱ्या त्या स्त्रिया, मुलींच्या शिक्षणाकडे त्यांचे कसे लक्ष जावे ? पण आईने गोड गोड बोलून त्या बाया-बापड्यांना आपलेसे करुन घेतले. बेंदूर (पोळा) नागपंचमीसारखे त्यांना जवळचे असणारे सण शाळेत साजरे केले. झिम्मा फुगडीचे खेळ शिकविले. नागपंचमीची गाणी शिकविली. वटपौर्णिमेला वडाभोवती फेर धरुन त्या बायांबरोबर गाणी म्हटली. ही बामणीण आपल्यात इतकी मिसळते हे बघून त्या बायांना हे एक आक्रितच वाटले. आपल्या मुलींना शाळेत पाठवण्यास त्यांनी सुरुवात केलीच पण त्या स्वतः आईने सुरु केलेल्या प्रौढ साक्षरता वर्गात येऊ लागल्या. शाळेत हातात फणी घेऊन मुलींचे केस कसे विंचरावेत, स्वच्छता कशी राखावी याची प्रात्यक्षिके, आईने गटागटाने सर्वाना दाखवली. त्यामुळे त्या बाया आपापल्या मुलींच्या मागे लागून त्यांना शाळेला पाठवू लागल्या. ही एक अबोल क्रांतींच होती. कुणी दखल घ्यावी अशा अपेक्षेने आई कधीच अशा गोष्टी करत नव्हती. तो तिचा सहजधर्म होता. पण सुगंध न सांगता सवरता आसमंतात पसरतोच. आईने मेहनत घेऊन शाळेच्या विद्यार्थिनीना अनेक विषयांची गोडी लावली. वक्तृत्व स्पर्धेत, क्रीडास्पर्धेत, नाट्यस्पर्धेत त्या विद्यार्थीनीनी प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळवली. शाळेला ढाली मिळवून दिल्या, आणि नैमित्तिक अभ्यासात पी. एस. सी. परीक्षेचा उत्कृष्ट निकाल लावून दाखवला. याबद्दल नगरपालिकेने विशेष ठराव करुन आईचे अभिनंदन केले. पण त्यापेक्षा खरी पोचपावती, सांगलीवाडीच्या गावकऱ्यांकडून मिळाली. ग्रामीण वातावरणातील शाळेला एवढ्या उर्जितावस्थेला आणलं याबद्दल कृतज्ञताबुध्दीने १९७२ साली आई त्या शाळेतून सेवानिवृत्त झाली तेव्हा गांवकऱ्यांनी मोठा भावपूर्ण निरोप समारंभ आयोजित करुन आईला मोठीच मानवंदना दिली. इतकेच नव्हे तर सांगलीवाडीच्या शाळेचा शताब्दि महोत्सव झाला तेव्हा आई सेवानिवृत्त झाली होती तरी मुद्दाम पाचारण करुन आईला त्या महोत्सवात गौरवपूरक समाविष्ट करुन घेतले.

 यानंतर आईच्या आयुष्यातील अखेरचे पर्व सुरु झाले आणि ते अत्यंत क्लेशकारक झाले. १९७२ मध्ये ती सेवानिवृत्त झाली. त्याचवर्षी मी डोंबिवलीत

(८)