पान:पुत्र सांगे.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेतल्या. कै. वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण हा अभिनव उपक्रम पाहून थक्क झाले होते. त्यावेळचा, त्या दोघांसह असलेला आईचा एक फोटो दादांनी कौतुकाने आमच्या घरात लावला होता. मात्र शिक्षणक्षेत्रात आईचे नांव सर्वतोमुखी झाले ते तिने अविश्रांत परिश्रमाने बसवलेल्या राष्ट्रगीताचा कार्यक्रमामुळे. एक हजार विद्यार्थिनींचे राष्ट्रगीत तिने एका तालात, एका सुरात सादर केले तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी आईच्या उपक्रमावर मुक्तकंठाने स्तुतीसुमने उधळली होती. आमची आई चांगल्या कविता करते याचा आम्हाला थांगपत्ताच नव्हता. पण राजमतीला होता. आपल्या मैत्रिणीच्या काव्यगुणांची तिला यथार्थ जाणीव होती. गुणी गुणं वेत्ति' हेच खरं. इत:स्तत: विखुरलेल्या आईच्या कविता एकत्र करुन त्यांचा 'गीतरेखा' नावाचा एक काव्यसंग्रह राजमतीबाईनी स्वतः प्रकाशित केला. समारंभपूर्वक थाटामाटात प्रकाशन सोहळा साजरा झाला. त्या दोघींच्या फावल्या वेळातील गप्पांचा विषयही शाळेचाच असे मग शाळेच्या वेळात त्या दोघी काय काय करत असतील याची कल्पना येईल. शाळेचा निकाल प्रतिवर्षी अधिकाधिक चांगला लागावा, यासाठी त्या दोघींची सतत धडपड असे. राजमतीला आई सोडायची नव्हती आणि आईला राजमती सोडायची नव्हती. पण शिक्षणखात्याला ते कसे परवडणार ? जेव्हा नोकरीतील शेवटच्या चार-पाच वर्षासाठी सांगलीवाडीच्या शाळेत आईची मुख्याध्यापिका म्हणून नेमणूक झाली तेव्हा दोघींच्या अश्रूंना खळ पडत नव्हती. इलाजच नव्हता. नावारुपाला आणलेल्या राजवाडा चौकातील आपल्या प्रिय शाळेचा, सहकारी शिक्षिकेंचा आणि आपल्या प्रिय राजमतीचा निरोप घेणे आईला भागच पडले. योगायोग कसा असतो बघा. राजवाडा चौकातील मुलींची शाळा नं. १ मध्ये आई नोकरीला होती तेव्हा आमचे राहाते घर शिवाजीनगरात होते. सध्याच्या दडगे गर्ल्स हायस्कूल जवळ. तिथून आई रोज पायपीट करीत शाळेला यायची. १९६४ मध्ये आई दादांनी शिवाजी नगरातील भाड्याची जागा सोडून, मोठ्या जिद्दीने राजवाडा परिसरात स्वतःचे छोटेसे घरकुल उभे केले. आता आईला शाळा अगदी कोपऱ्यावरच म्हणून आम्ही आनंदलो; आणि नेमक्या याच वेळी आईची बदली लांब, आयर्विन पुलापलीकडील सांगलीवाडीत भागात झाली; म्हणजे पायपीट कांही चुकली नाही !

 सांगलीवाडीतील शाळाही शहरापासून थोडी बाजूला आणि खेडेगांवी वातावरणातील असल्याने, आईला ते एक प्रकारे आव्हानच होते; आणि ते

( ७ )