वरदान होतंच. फक्त अंगभूत गुण पूर्णत्वाला नेणं कुणालाच जमलं नाही. ताई शाळांमधून नाटकं बसवायची. नानाने (वसंतराव हेबाळकर ) पुढे शिक्षणक्षेत्रात चांगले नांव कमावले. धाकटी सुशामावशी नाटकातून सुरेख कामं करायची. महिला मंडळांच्या माध्यमातून ती अनेक नाट्यप्रवेश, एकपात्री प्रयोग करायची. आमच्या आईमध्ये हे सर्व गुण होतेच. पण गानकला अधिक उच्च दर्जाची होती. माझ्या वडिलांना संगीतातील ओ का ठो कळत नसे. पण आपल्या बायकोमधील या संगीताला चांगल्या पध्दतीने विकसित केलं पाहिजे याची पहिली क्रियाशील जाणीव त्यांनाच झाली. थोडी सुस्थिती प्राप्त झाल्यावर त्यांनी भूतपूर्व संस्थानचे राजगवई दिनकरबुवा गोडबोले यांची आईसाठी शिकवणी ठेवली. त्यावेळी तिने वयाची चाळीशी केव्हाच पार केली होती. गोडबोले बुवांचं शिकवणं फारच पारंपारिक होतं. एका परिक्षेसाठी गांधर्व महाविद्यालयाचे अध्वर्यू पं. विनायकबुवा पटवर्धन आले होते. आईचा आवाज ऐकून ते फारच खुश झाले. त्यांनी आईला पुण्यात येऊन शिकण्याचा आग्रह केला होता. नेमकी अशीच सूचना चार वर्षापूर्वी मा. कृष्णराव फुलंब्रीकर 'वंदे मातरम्'ची चाल शाळाशाळातून शिकवण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी केली होती. अर्थात ही गोष्ट शक्य नव्हती. गोडबोलेबुवांनंतर, दादांनी आईसाठी चिंतुबुवा म्हैसकर यांची शिकवणी ठेवली. ते आमच्या घरी शिकवायला यायला लागले. आईची चांगली स्वतंत्रपणे ख्याल मांडण्याइतकी तयारी झाली होती. पुणे नभोवाणी केंद्रावरील ऑडिशन टेस्टमध्ये आई यशस्वी झाली होती. सांगली नगर वाचनालय, सांगली जिमखाना आणि अन्यत्र तिने गाण्याच्या तुरळक मैफली केल्या होत्या. पण मग आईला कानाच्या दुखण्याने सतावले आणि आईच्या संगीत शिक्षणात वारंवार खंड पडू लागला आणि अखेरीस ते बंदच करावे लागले; अर्थातच डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन.
या सर्व अभ्यासाचा आईला, स्वत:ला शालेय जीवनासाठी खूपच उपयोग झाला. संस्थानी काळात अनेक ठिकाणी नोकऱ्या करत करत तिची बदली मुलींची शाळा नं. १ मध्ये झाली. तिथं तिला एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तिची बालमैत्रिण, मुख्याध्यापिका असलेली राजमती पाटील आपल्या इंदूची वाट पहात शाळेच्या प्रवेशदारातच उभी होती. दोघी खूप सुखावल्या. आईच्या कर्तृत्वाला खरे धुमारे फुटले ते या राजमतीमुळेच. हजार हजार मुलींची कवायत आई अगदी आरामात घेत असे. शाळेच्या वार्षिक निवडणुकी घेताना, तिने त्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुकांची रंगीत तालिमच वाटावी अशा थाटात