श्रेय आमच्या आईलाच द्यायला हवे. मात्र ह्या गोष्टीची थोडीफार किंमत आमच्या दादांनाही मोजावी लागली. "तू आता टिळक राहिलासच कुठे ? तू तर आता पूर्ण हेबाळकरच झालास ?" अशी कुत्सित बोलणी त्यांना इतरांकडून ऐकून घ्यावी लागत. मला आठवतय, माझ्या बालपणी प्राथमिक शाळेच्या कालावधीत, 'तू अर्धवट आहेस' (म्हणजे अर्धा देशस्थ आणि अर्धा कोकणस्थ ) असं मला ऐकायला लागत असे. ५५-६० वर्षापूर्वीच्या काळात जाती-जातीमधील (म्हणजे खुद्द ब्राम्हणांच्या पोटजातीतच ) कंगोरे एवढे धारदार होते की अशी कुत्सित टवाळकी क्षम्यच मानायला हवी. मी मुंबईला नोकरीनिमित्त गेल्यानंतर मात्र दादांकडील मुंबईचे नातेवाईक आमच्याशी पूर्णपणे एकरुप झाले. माझ्या आईचे निधन १९७४ मध्ये झाले. त्यानंतरही हेबाळकर ब्रम्हनाळकर टिळक एकोपा टिकून राहिला. त्याचे सर्व श्रेय माझा धाकटा भाऊ रविंद्र टिळक आणि विशेषतः त्याची पत्नी, माझी भावजय कै. सौ. चारुशीला टिळक हिला आहे. १९८५ मध्ये आमच्या दादांचे निधन डोंबिवलीला माझ्या घरी झाले. ताईचे म्हणजे गंगूताई ब्रम्हनाळकर यांचे निधन १९८९ मध्ये तर वसंतराव हेबाळकर यांचे निधन १९९९ मध्ये झाले. अशा तऱ्हेने वर्तुळांचे एकेक परिघ नष्ट होत, आता सर्व टिळक कुटुंबिय एकत्र आहेत. विस्ताराने सांगण्याचे कारण एकच. आमच्या आईने रुजवलेली एकोप्याची शिकवण. असो.
दादांशी विवाह झाल्यानंतर एक मात्र झाले. आईच्या ठायी असलेला न्यूनगंड जवळपास पूर्णपणे नाहीसा झाला. दादांच्या प्रोत्साहनाने आणि शिकवण्याने ती मॅट्रिक झाली. त्या काळी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुलकी परिक्षेत तर तिने मोठेच सुयश संपादन केले. कोल्हापूर केंद्रात तिने पहिला क्रमांक पटकावला. सुरुवातीला कै. राणीसाहेबांच्या दयेपोटी संस्थानी काळात ती शिक्षिका झाली होती. संस्थान विलीन झाल्यावर तिला ट्रेंड शिक्षिका होणे आवश्यक होते. त्याप्रमाणे वखारभागातील कस्तुरबा ट्रेनिंग कॉलेजमधून तिने दोन वर्षाचा ट्रेनिंग कोर्स पूर्ण केला. सीनिअर ट्रेनिंगची परिक्षा ती प्रथमवर्गात पास झाली. पुण्यात जाऊन सुप्रसिध्द दिग्दर्शक के. नारायण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने नाट्यकलेचे प्रशिक्षण घेतले. औंदुबराच्या शिबिरात दोन महिने राहून तिने शारिरीक शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं संगीत-शिक्षण. मुळात आवाजाची देणगी तिला होतीच. तसं पाहिलं तर ह्या सगळ्याच हेबाळकर भावंडांना काव्य-शास्त्र - विनोदाचं