Jump to content

पान:पुत्र सांगे.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लग्न लावले. १७ जानेवारी १९३६ हा तो दिवस. तेवढ्यातही देशस्थ - कोकणस्थ विवाह म्हणून अनेकांनी नाके मुरडली. पुराच्या लोंढ्यात सापडलेल्या दोघांनी, कुठल्यातरी खडकाच्या आधारे एकमेकांना धरुन रहावे तसे आई आणि दादांचे झाले होते. तथापि दुर्देवाच्या फेऱ्यात अडकलेल्या दोघा समानधर्मीयांचे लग्न मात्र उभयपक्षी फलदायी झाले.

 सांगली संस्थानाचा कांही भूभाग त्याकाळी कर्नाटकातील बेळगांवजवळील शहापूर भागात होता. आई-दादांची नोकरी शहापूर भागात, नंतर कवठेमहांकाळ भागात झाली. शहापूरला असताना मला एक थोरली बहिण झाली होती. अगदी गोरीपान आणि फुलासारखी छान. खूप चुणचुणीत आणि हुषार होती. बोलायची खूप गोड. मला हे सगळं आई, दादा आणि मामा मावशीकडून नंतर कळलं. कारण अवघी ४ वर्षाची होऊनच ती गेली. शहापूरची हवा तिला मानवली नाही. आईलाही त्याचा त्रास होत असे, म्हणून बदलीचे प्रयत्न चालू होतेच. त्याप्रमाणे सांगलीला बदली झाली. बदली थोडी आधी झाली असती तर बेबीची (माझ्या दिवंगत बहिणीची) आबाळ झाली नसती असे आईला राहून राहून वाटे.

 १९३८-३९ मध्ये शहापूर बेळगांवमधून बदली झाल्यावर ती उभयता सांगलीत आले. वास्तविक दोघांनी मिळून वेगळे बिऱ्हाड स्थापून राहणे हे स्वाभाविक होते. पण आईच्या माहेरी म्हणजे हेबाळकर कुटुंबाला मनुष्यबळाची आणि थोडीफार अर्थबळाचीही आवश्यकता होती. त्या घरात आईखेरीज तिची वृध्द आई, कुटुंबाचा व्याप स्वत:च्या खांद्यावर घेऊन चालणारी ताई म्हणजे गंगूताई ब्रम्हनाळकर, अजून अल्लड असलेली शाळकरी बहिण, सुशीला (नंतरची सुशीला अडके) अशा हेबाळकर कुटुंबात एखाद्या कर्त्या पुरुषाची नितांत आवश्यकता होतीच. एकमेव भाऊ वसंता अजून वयाने लहान होता. आमचे दादा तसे एकटेच होते. पितृछत्र लहानपणीच हरवलेले. मातृछत्राला लग्नाआधीच पारखे झालेले. सख्खी भावंडे कोणीच नाहीत तेव्हा या वस्तुस्थितीचा विचार करुन दादांनी आईच्या प्रस्तावास होकार देऊन हेबाळकर कुटुंबाला वाहून घेतले. टिळक, हेबाळकर, ब्रम्हनाळकर एकत्र राहू लागले. थोड्याफार कुरबुरी प्रत्येक कुटुंबात असतातच. तशा त्या टिळक, ब्रम्हनाळकर, हेबाळकरांमध्ये ही असतीलच. पण तरीसुध्दा ही विभिन्न कुटुंबियांची मोट अखेरपर्यंत एकत्र राहिली. नव्हे, एकमेकांना घट्ट धरुन राहिली ही गोष्ट विलक्षणच म्हटली पाहिजे. याचे मोठे

(४)