पान:पुत्र सांगे.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

थोरल्या बहिणीचे लग्न झाले होते. त्यांनतरची सोनूताई तथा गंगूताई ब्रम्हनाळकर ही बालविधवा होती. राणीसाहेबांच्या कृपेमुळे मुलीच्या शाळेत नोकरीला होती. पगार केवळ २० रु. घरात विधवा आई, विधवा भावजय, इंदू, वसंत आणि सुशीला अशी धाकटी भावंडं. अशा ५-६ निराधारांचा संसार आमच्या मावशीने (म्हणजे गंगूताई ब्रम्हनाळकर) मोठ्या नेकीने आणि जबाबदारीने सांभाळला. तिची दमछाक बघून आईने आपले हायस्कूल शिक्षण गुंडाळून ठेवले. राणीसाहेबांची आमच्या मावशीवर मर्जी होती. त्यामुळे आईला शिक्षिकेची नोकरी मिळाली. रुपवान, धनवान मैत्रिणीना सोडून आई निमूटपणे आपल्या प्राक्तनाला सामोरी गेली. थोड्याच वर्षात वसंता मॅट्रिक झाल्यावर त्यालाही नोकरी मिळाली. हा वसंता म्हणजेच दडगे गर्ल्स हायस्कूल ही शाळा ज्यांनी नावारुपाला आणली ते वसंतराव हेबाळकर. अशी या कुटुंबाची मार्गक्रमणा बऱ्यापैकी सुसह्य होत होती. मात्र अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे आईमध्ये मोठ्या प्रमाणावर न्यूनगंड निर्माण झाला होता. शिक्षण अपुरे, रुपसंपदा यथातथा. हुंड्याने शिक्षण आणि रुपाची भरपाई करावी तर ती आर्थिक बाजू अधिकच लंगडी. थोरल्या ताईप्रमाणे कुटुंबाचा गाडा ओढण्यातच आपला जन्म जाणार अशा नैराश्यावस्थेत असतानाच, आमच्या दादांच्या रुपे तिच्या जीवनात प्रथमच आशेची पहाट फुलली. दादा म्हणजे रामकृष्ण वासुदेव टिळक. कोकणस्थ ब्राम्हण, गोरा वर्ण, बुध्दिमता अफाट, पण मातापित्यांचे छत्र हरपलेले. मूळच्या सुस्थितीतून वडिलांच्या अकाली निधनानंतर मुंबई सोडून दादांची आई आपल्या छोट्या रामकृष्णाला घेऊन कोल्हापूरला असलेल्या टिळकांच्या चुलत घराण्याकडे आश्रयाला आली. पण तिथं एक प्रकारचं आश्रिताचं जिणं जगणं, मानी स्वभावाच्या रामकृष्णाला परवडेना. मॅट्रिक होताक्षणी दादांनी कोल्हापूरातून गाशा गुंडाळला. आपल्या आईला घेऊन कुणी ओळखत नाही अशा ठिकाणी जायचं म्हणून ते सांगलीला आले. सांगली संस्थानात मिळालेली नोकरी पत्करुन आईला मीठभाकरच पण हक्काची, स्वकमाईची खाऊ घालू लागले. पण तेही सुख त्यांच्या नशीबी नव्हतं. अनेक वर्षे आबाळ झालेली, प्रकृतीची हेळसांड झालेली त्यांची आई थोड्याच आजारानंतर मृत्युमुखी पडली. असे दादा आणि तिकडे जवळपास तशाच अवस्थेत असलेली आई. दोघांनाही ओळखणाऱ्या तात्या कुलकर्णी मास्तरांनी मध्यस्थी केली. आईकडची भावंडं आणि दादांच्या बरोबर दोन शिक्षक अशा मोजक्या आठ-दहा माणसांनी नरसोबाच्या वाडीला जाऊन आई-दादांचे

( 3 )