पान:पुत्र सांगे.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(सोलापूरचे गाजलेले कॉंग्रेस पुढारी छन्नूसिंग चंदेले यांची पत्नी) अशा मैत्रिणी लाभल्या. त्यात पुढे शांति कोल्हटकर, चिंगी पटवर्धन यांची भर पडली. या सर्वच मैत्रिणी एकजात स्वरुपसुंदर होत्या. आईला, स्वतःच्या आणि या मैत्रिणींच्या रुपातील तफावत फार जाणवे. पुढे आईला रंगी काळे नावाची आणखी एक मैत्रिण भेटली. ती मात्र आपल्या आडनावाप्रमाणेच काळी होती. ती आणि आमची आई अशा दोघीजणी सांगली हायस्कूलमध्ये असताना मधल्या सुट्टीत शेजारच्या आंबराईत जाऊन बसत. देवाने आपल्या दोघीनाच रुप दिले नाही म्हणून गळ्यात गळे घालून रडत बसत ! रडून मन हलके झाल्यावर मग दोघी चेहरा धुवून शाळेत तासाला जाऊन बसत. एका गोष्टीची मला गंमत वाटे. आमची आई तशी मितभाषी आणि सकृतदर्शनी तरी गंभीर वाटावी अशी होती. पण तिच्या स्वभावात, वागण्या बोलण्यात असं कांही अगम्य रसायन होतं की या सगळ्या मैत्रिणी अगदी अखेरपर्यंत तिच्यावर उत्कट आणि उत्स्फुर्त प्रेमाचा वर्षाव करत असत. आईला पुढे विपन्नावस्था आली, परिस्थितीमुळे तिला प्राथमिक शिक्षिका बनावं लागलं, तरी या मैत्रिणींचे प्रेम रतीभरही कधी आटलं नाही. शाळेचे दिवस मजेत चालले होते. घरी वडिलांचे प्रेम आईवर जरा जास्तीच होते. याची कारणे दोन. एक तर आईचा गोड गळा आणि दुसरं म्हणजे आईच्या हातचा चविष्ट स्वयंपाक आणि विशेषत: कर्नाटकी पध्दतीची चिंचगुळाची खमंग आमटी. एखादे वेळी ही आमटी अन्य कुणी केली असेल तर ते आण्णांच्या, आईच्या वडिलांच्या लगेच लक्षात येई. मग ते कुणी आमटी केली याची चौकशी करत. आईच्या बहिणींपैकी कधी सोनी तर कधी अक्का वगैरे पैकी कुणीतरी आमटी केलेली असे. आण्णा जेवता जेवता सांगत, “सोनीला सांगा की आमटी चांगली झालीय पण पुन्हा कांही करु नका म्हणावं."

 पण हे सुखाचे दिवस एकदम सरले. आई हायस्कूलमध्ये असतानाच आण्णांचे निधन झाले आणि त्यांचं निधन सर्वाना निर्धन करुन गेले ! आईचा थोरला भाऊ तेव्हांचा पदवीधर होता पण व्यापाराला कच्चा ठरला. त्या काळी चालणारे सट्टे एका रात्रीत रावाला रंक आणि रंकाला राव बनवून टाकत. आईच्या आणि सर्व भावंडांच्या दुर्देवाने त्यांच्या भावाला सट्ट्यात प्रचंड ठोकर बसली. तो आघात सहन न झाल्यानं त्याने आत्महत्या केली आणि अशा वेळी नेहमी जे होतं तेच झालं. देणेकऱ्यांचे तगादे सुरु झाले. जप्तीवॉरंट आलं. अशा कठिण प्रसंगी सांगलीच्या राणीसाहेबांनी (श्रीमंत सरस्वतीदेवी पटवर्धन) मदत केली. सगळ्यात

( २ )