पान:पुत्र सांगे.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आई दादा आणि त्यांचे भावजीवन ।

 कै.सौ. इंदूमती रामकृष्ण टिळक ही माझी आई. तिचा जन्म १८ ऑगस्ट १९१४ सालचा, म्हणजे आजच्या घडीला तिचं वय ८८-८९ च्या घरात असतं. आजकाल लागलेल्या नवीन नवीन शोधांमुळे सर्वसामान्य माणसाची आर्युमर्यादा वाढली आहे. ८८-८९ वर्षाची माणसे बऱ्यापैकी कार्यक्षम अवस्थेत आपण अवतीभोवती पाहतो. पण ते सुख आमच्या आईच्या नशीबी नव्हतं. अवघ्या साठ वर्षाचं आयुष्य तिला लाभलं. शाळेतून निवृत्ती पत्करल्यावर थोडं सुखाचं आयुष्य जगावं असं तिच्या मनात यावं आणि तेवढ्यातच वरचा निरोप यावा ही किती क्लेशकारक बाब ? पण दुर्देवाने तीच तिच्या नशीबी आली.

 माझ्या आईचा जन्म चांगल्या सधन घरात झाला. तिचे वडील कै. विष्णू सावळाराम हेबाळकर हे मोठे अडत व्यापारी होते. सांगली नगरपालिकेचे ते सदस्य होते. सहा भावंडांमध्ये आई तिसऱ्या नंबरची. तत्कालीन वखार भागातच वास्तव्य असल्यानं आणि वडील प्रागतिक विचाराचे असल्याने आईला शिक्षणाची संधी मिळाली. जैन महिलाश्रमाच्या शाळेत तिचं प्राथमिक शिक्षण झालं. तिथंच तिची राजमतीबाई पाटील या कालांतराने सांगली भूषण म्हणून समारंभपूर्वक गौरविल्या गेलेल्या जैन समाजातील थोर व्यक्तिमत्वाबरोबर दृढ मैत्री झाली आणि अखेरच्या श्वासापर्यंत ती टिकली. जैन समाजातील राजमती आणि ब्राम्हण समाजातील इंदूमती यांची विलक्षण मैत्री हा त्या काळातील सुरुवातीला कुतुहलाचा आणि नंतर कौतुकाचा विषय होता. वडिलांची पेढी आणि राहाते घर एकत्र असल्याने आईसह सर्व भावंडं, लहानपणी पेढीवर बसून मुठी मुठीने नाणी मोजत. बोलण्याच्या ओघात आई ज्यावेळी अगदी अभावितपणे ही गोष्ट मला सांगत होती, त्यावेळी आमच्या घरात नोटांचा दुष्काळ आणि नाण्यांची चणचण होती ! आई नंतर सांगली हायस्कूलमध्ये होती. त्या काळी म्हणजे ८०-८५ वर्षापूर्वी सांगलीत इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुली अगदी हाताच्या बोटावर मोजाव्यात इतक्याच होत्या. आईचे वडील नुसतेच प्रागतिक विचारांचे नव्हते तर त्या काळी सांगलीतील सामाजिक आणि राजकीय चळवळींचे उगमस्थान असलेल्या बहुचर्चित युनियन क्लबचे सभासद होते. त्यामुळेच आई इंग्रजी शाळेत जाऊ शकली. सांगली हायस्कूलमध्ये असताना आईला विमल ठोंबरे (तत्कालीन सांगली संस्थानचे दिवाण रावबहाद्दुर ठोंबरे यांची कन्या), गजरा ठाकूर

( १ )