Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
८२
 

पाहणारांस असें दिसतें कीं, कोणी ना कोणी- मग तो अवतार असो अथवा प्रेषित असो- भूलोकावर उत्पन्न होतो व त्या त्या ठिकाणच्या मनुष्ययोनीच्या जीवितांत जीं वैगुण्यें उत्पन्न झाली असतील किंवा योग्य त्या गुणांचा अभाव असेल, तीं दुरुस्त करून किंवा ते गुण उत्पन्न करून लोकांच्या जीविताचा गाडा सुरळीत चालू करून देतो. म्हणजे असें कीं, पूर्वी उत्पन्न झालेल्या पीठिका झिजत जातात व भाबडीं माणसें त्या पीठिकांच्या घसड्यांसच लोंबकळत राहतात. त्यांना नवीन बंधने हवी असतात. लोक जेव्हा जुन्या शास्त्राच्या विरुद्ध बोलूं लागतात तेव्हां त्यांना शास्त्रच नको असतें असें नाहीं; तर तें जुनें शास्त्र नको असतें. म्हणून नवीन शास्त्र उत्पन्न करून त्या गवसणीत ह्यांचें जीवित जो कोणी बरोबर बसवून देईल तो त्या युगाचा आरंभक होय. ही गोष्ट इतिहासांत वरचेवर झालेली आपण पाहातों. एखादा मनुष्य आपल्या पिढीपुरताच तत्त्वज्ञानी किंवा कार्यकर्ता ठरतो- दुसरा एखादा अशी करामत करतो कीं, आजूबाजूची शंभर वर्षे त्याच्याच नांवावर मोडतात; लोक त्याला सेंचूरियन म्हणतात. त्याची सद्दी संपली- म्हणजे त्याची शंभर वर्षे टिकणारी कल्पना संपली- म्हणजे नवीनाची सद्दी सुरू होते. हीच कर्तबगारीची व कल्पनेची व्याप्ति वाढत गेली म्हणजे आपल्या सामर्थ्यानें आजूबाजूच्या हजार वर्षांवर हुकमत गाजविणारा पुरुष निःसंशय उत्पन्न होतो असें दिसेल. यालाच कदाचित् लोक परमेश्वराचा अवतार अथवा प्रेषिताचें येणें म्हणत असतील. पण हें अवताराचें अथवा प्रेषिताचें येणें म्हणजे कोणच्याही ठिकाणी ज्याची घटना झाली नाहीं असा कांहीं उत्पात नव्हे. किंबहुना ज्याला आपण उत्पात म्हणून म्हणतों तो बिनचौकस बुद्धीला उत्पात वाटेल; कार्यकारणाची मीमांसा पाहणारांना वाटणार नाहीं. हे जे अवतारी किंवा प्रेषित पुरुष येतात त्यांच्या जीवितांतील संदेश केवळ त्यांच्याच