Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८१
येशू ख्रिस्त
 

देशाकडे पलायन केलें व हेरॉड मरेतोंपर्यंत तीं तेथेंच राहिली. जुन्या ख्रिस्ती पुराणावरून पाहतां हें असें घडून येईल अशी भविष्यवाणी आगाऊच झालेली होती. पुढे दरवर्षी मुलाला घेऊन आई-बाप यरुशलेमास जात. एकदां यात्रा संपवून परत जातांना त्यांना दिसून आलें कीं, येशू मागेच राहिला आहे. त्यांना वाटलें मुलें मुलें मिळून येत असतील; म्हणून तीं दोघें तशींच पुढें झटकली; पण तो येतां दिसेना. असें पाहून तीं दोघे पुन्हा यरुशलेमास आली. पहातात तो शास्त्री पंडितांच्या मेळांत बसून येशू कांहीं अध्यात्मचर्चा करीत आहे. त्याच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवरून हा मुलगा महान् बुद्धिमान् आहे असें सर्व लोक उमगले. चर्चा आटोपल्यानंतर आईबापांबरोबर येशू नाझारेथ येथें गेला. वास्तविक या वेळीं येशूचें वय केवळ बारा वर्षांचें होतें. पण एवढ्याशा वयांत त्याच्या बुद्धीला प्राप्त झालेलें परिणत रूप पाहून हा पुढें अवतारी पुरुष ठरणार अशी सर्वांची खात्री होऊन चुकली. हा अवतारी पुरुष आहे ही कल्पना करणें व ही कल्पना जुळणे फारसे अवघड नव्हतें. कारण अवतार येणार आहे अशी भविष्यवाणी अनेकदां उठली होती व नवीन अवताराची वाट मिसर देशांतील सर्व शहाणे लोक आतुरतेने पहात होते.
 पण ही अवताराची भूक समाजास कां लागली होती? अवतार हा शब्द ख्रिस्ती किंवा मुसलमानी धर्मतत्त्वांप्रमाणें चुकीचा आहे. त्यांचा खरा शब्द म्हणजे 'प्रेषित' हाच होय. 'ज्या ज्या वेळीं धर्माची ग्लानि होईल त्या वेळीं मी अवतरतों, सज्जनांचे संरक्षण व दुष्टांचें निर्दलन मी प्रत्येक वेळीं करीत असतो' असें आश्वासन हिंदूंच्या देवानें त्यांस दिलें आहे. ख्रिस्ती देव स्वतः केव्हांही अवतरत नाहीं, तर आपल्या पुत्रास धाडतो. देव स्वतः अवतरतो, कीं पुत्रांकरवीं कार्यभाग उरकून घेतो याचा निकाल करणें केवळ आध्यात्मिकांसच शक्य आहे; पण इहलोकची घडामोड
 पु.श्रे. ६