Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८३
येशू ख्रिस्त
 

तोंडून पहिल्याने बाहेर पडतो असें नव्हे. त्या संदेशाची जरुरी आणि त्याची गुणगुण हीं आधीं कित्येक वर्षे समाजांत चालू असतात. इतकेंच कीं, हळुहळू वाढत असलेल्या व मंद आवाजानें नादावत असलेल्या या संदेशाला त्याच्या हातीं भव्य व कदाचित् उग्र असें सुद्धा रूप प्राप्त होतें व मग झोपा काढणारे लोक एकमेकांस सांगतात कीं, 'उठा, अवतार झाला'; परंतु आधींच्या अज्ञानतिमिरांत जे 'संयमी' जागे असतात त्यांना प्रभातकालाचीं चिन्हें आधीं दिसूं लागतात. शुक्राचा तारा चमकूं लागतो व पूर्व दिशा उजळूं लागते. मागी लोकांना तारा दिसला व या ताऱ्याच्या मागोमाग येशूरूप ज्ञानसूर्याचा उदय खास होणार हे त्यांच्यासारख्या प्रज्ञावंतांनी निश्चित ओळखिलें होतें.
 पण तेवढ्यानेंच झालें नाहीं. आपापले जीवितहेतु न ओळखणारे आपण बहुतेक असतो. आपल्या मनाच्या आकांक्षा व आपापली सामर्थ्यं यांची तोलदारी कितपत आहे याचा हिशेब लागलेला नसतांनाच आपला जीवितहेतु निश्चित करणारे शेकडों लोक असतात व प्रत्येक ठिकाणीं फसगत झाल्यामुळे रोज नवीन कामाची उठावणी करतात; पण असेही कांहीं थोडे असतातच, कीं जे मागचे पुढचें पहातात, आपलीं सामर्थ्ये तोलतात व मग त्यांस मनापासून असें वाटतें कीं, अमुक एक काम हें आपलेंच होय. त्यांत सर्व हयात खर्च केल्यावर आपल्याहून बलवत्तर माणसाची ते वाट पहात बसतात. या कामी त्यांस मानहानि वाटत नाहीं. कारण ते तत्त्वज्ञानी असतात. येशू जन्मास येऊन आपले काम करूं लागावयाच्या आधीं त्या प्रांतांत जॉन दि बॅप्टिस्ट म्हणजे बाप्तिस्मा देणारा जोहान्न उत्पन्न झाला होता. हा योहान्न याच कोटींतील होता. लोक पातकी झाले आहेत, नीतिविचारांपासून भ्रष्टले आहेत, परमेश्वराचीं विकृत रूपें पूजीत आहेत आणि सर्वांहून वर, मानव्याचे सर्व विचार ज्याच्या