Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१८८
 

पूर्वी रशियन लोकांतील प्रतिष्ठित लोकांच्या वंशावळ्या दरबारांतच ठेवीत असत. मोठमोठाले अमीरउमराव, सरदार, दरकदार, इनामदार, कीं ज्यांच्या वाडवडिलांनी सरकारची बहुत सेवाचाकरी केली आहे, अशांचे वंशवेल दरबारांत असून प्रत्येक पिढीच्या कोणच्या पुरुषानें कोणचीं कामें केलीं याचीहि नोंद त्यांत असे. तेथपर्यंत सर्व ठीक झालें. पण पुढे पुढें असें होऊं लागलें कीं, ज्यांच्या शूर, बुद्धिवान पूर्वजांनीं सरकारचीं मोठमोठीं कामें केलीं असतील, ते स्वतः कितीहि नामर्द व मूर्ख असले तरी त्यांच्या पूर्वजास सरकारने सांगितलेल्या कामांहून कमी दर्जाचीं कामें करावयास ते नाखुषी दाखवूं लागले. ते म्हणत येवढ्या थोरांच्या वंशजांनी कमी दर्जाचीं कामें कशी करावीं? यामुळें नालायक व ऐदी प्रतिष्ठितांचा लोंबाळा दरबारामध्ये फारच माजला. ही एक अडचण झाली. दुसरी अशी कीं, एक चमत्कारिक पीठिका उत्पन्न होऊन बसली. कोणास किती पूर्वज मोजतां येतात यावर लायकी नालायकी ठरावी, असा आग्रह सुरू झाला. म्हणजे असें कीं, आपले दहा पूर्वज ओळीनें सांगतां येणाऱ्या एकाद्या जमाबंदी खात्यांतल्या नोकरानें सेवान्तवेतन घेतलें व त्याच्या जागीं नेमावयासाठीं जर राजानें दुसऱ्यास बोलाविलें तर तो नवा माणूस प्रथम ही चवकशी करी कीं, पेन्शनीत निघालेल्या नोकरास स्वतःचे किती पूर्वज सांगतां येत होते? जर आढळून आलें कीं, त्यास दहा पूर्वज सांगतां येत असत; पण याला मात्र जर स्वतःचे पंधरा सांगता येत असले तर तो राजासच परत टाफरून विचारी कीं, माझ्याहून आंखूड वंशवेलाच्या माणसाने हाताळलेली नोकरी मला करावयास सांगणें तुम्हांस शोभतें काय? असल्या या मानापमानाच्या कल्पनांमुळें राजाची मोठी कुचंबणा होत असे.
 तेव्हांचें राजयुग होतें. अर्थात् राजाचें कुल, त्याचे आप्तइष्ट व अमीर उमराव अगर तत्सम तालेवार लोक यांच्यांतूनच त्याला माणसें