Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८७
पीटर दि ग्रेट
 

झाली. नीपर नदीच्या पलीकडीलपर्यंतचा प्रान्त व स्लाव लोकांचें सुप्रसिद्ध नगर कीव् हींहि त्यानें युक्तिप्रयुक्तीनें मिळविली.
 याच्याच राजवटींत ख्रिस्ती धर्मग्रंथाची म्हणजे बायबलाची उजळणी करण्यांत आली. निकन नांवाच्या आचार्यानें ही गोष्ट मनांत आणिली. कारण कीं, नकला करणारांच्या हातून साहजिकच होणाऱ्या चुका शतकानुशतक बायबलांत इतक्या सांचत आल्या होत्या कीं, मूळ शुद्ध पाठ कित्येक ठिकाणीं भलतेच होऊन बसले होते. वास्तविक असली संस्करणें हवींच असतात. पण निकननें हें काम सुरू करतांच लोकांचा विरोध सुरू झाला! लोकांना येवढे माहीत कीं, जुनें जपावें. निकन तरी जुनें खरें कोणतें तेंच सांगत होता, पण तें त्यांस पटेना. ग्रीक बायबलावरून शुद्ध भाषांतराच्या नकला त्यानें करविल्या व ठिकठिकाणच्या प्रार्थनामंदिरांतील जुनीं बाडें परत मागवून तेथें त्यानें हीं नवीं पुस्तकें धाडून दिली. पण एवढ्यावरून रशियन धार्मिकांत दोन पंथ झाले, एक जुनेवाले म्हणजे चुक्यावाले व दुसरे नवेवाले. या निकनला राजाचा मोठा पाठिंबा होता. याशिवाय राजाने राज्याची व राजधानीची शोभा वाढविण्यासाठीही पुष्कळ खटपटी केल्या. बाहेरच्या देशांतील एकादा शेलका माणूस कामापुरता नोकर म्हणून ठेवण्याचीहि त्याची तयारी असे. एकंदरीने आलेक्झी हा बऱ्यापैकीं राजा झाला. हा इ० सन १६४८ त वारला. याच्या पहिल्या राणीला फेओदर व इव्हॅन असे दोन मुलगे आणि सोफिया नांवाची मुलगी अशीं तीन अपत्यें होतीं व दुसरीला पीटर नांवाचा एकच मुलगा होता.
 आलेक्झीच्या मृत्यूनंतर फेओदर गादीवर बसला. पण त्यानें अवघें सहा-सात वर्षेच राज्य केलें. तो प्रकृतीने अगदीं दुबळा असून कर्तबगारहि नव्हता. त्याला मूलबाळहि कांहीं झालें नाहीं. पण कुळांत सुरू झालेली सुधारणाप्रियता त्याच्या दुबळ्या शरीरांतहि उतरली होती. ती त्याने एका बाबतींत चमत्कारिक रीतीनें जगास दाखविली.