Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८९
पीटर दि ग्रेट
 

काढावी लागत. समाजाच्या वाटेल त्या थरांतून माणसें उचलून घेणें अजून इतकेंसें सुरू झालें नव्हतें. अर्थात् राज्यकारभार चालवावयाचा म्हणजे वरील मंडळींतूनच लोक काढावे लागत व त्यांची अपेक्षाही तशीच असे. जर करतां राजानें यांना दूर सारून वाटेल तेथलीं माणसें भोंवतीं जमविलीं असतीं तरी तिकडूनहि फुकटमानी लोक राजाच्या नांवानें खडे फोडीत बसले असते. ज्याला जें करतां येईल तेंच त्यानें करावें असें म्हटलें म्हणजे त्यांच्यांतील एकाद्या ठोंब्यानेसुद्धां म्हणावें, माझा खापरपणजा सरफडणीस होता आणि मीं आतां कारकुनी कशी करावी? किंवा दुसऱ्या एकाद्यानें म्हणावें ज्याला दहाच बापजादे सांगतां येतात त्याची जागा मी पंधरा सांगणारानें कशी भरावी? या अडचणीमुळे राजा अगदीं किकून गेला. कुलपरंपरेचा अखंडपणा हा अभिजातपणा आणि गुणवृद्धि करतो हा विचार व त्याप्रमाणेंच राजसत्ता जशी तशी, राजसत्तेचा अंशरूप असलेली जी सरकारी नोकरी तीहि, भोगवट्याच्या दृष्टीनें त्या त्याच कुळांत चालावी हा विचार, हे अतिरेकास गेले.
 परंपरा आणि पीठिका कालगतीनें झिजून जाऊं शकतात हें माणसांच्या ध्यानांत येईना; पण जें सामान्यांस दिसेना अगर पटेना तें द्रष्ट्यांस दिसलें. फेओदर राजा एरवीं दुबळा खरा पण बेसिल गोलित्सिन या मुत्सद्द्याच्या संगतींत ही गोष्ट त्याच्या मनांत फार भरली व अगदीं कदरून गेल्यामुळे त्यानें एक घाव दोन तुकडे करून टाकण्याचें मनांत आणिलें. या वंशावळ्यांचे शेंकडों रुमाल सरकारी दप्तरांत असत. एके दिवशीं चुकलेल्या वंशावळ्या दुरुस्त करण्यासाठी सर्वच तपासून पहाणें जरूर आहे तर दप्तरें राजवाड्यांत हजर करावी असा हुकूम त्यानें दप्तरदारास काढिला. हुकमाप्रमाणें दप्तरें येऊन पडतांच तीं एकमेकांवर रचून ठेवावयास त्यानें सांगितले व हातांत चुडी घेऊन त्यानें तो ढिगारा पेटवून दिला. क्षणार्धात